बॉसच्या हातातून बाजी निसटली! आता AI ठरवणार तुमचा पगार किती वाढणार, बोनस द्यायचा का नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:10 IST2025-03-03T13:09:41+5:302025-03-03T13:10:11+5:30
एका अहवालानुसार १० पैकी ६ कंपन्या म्हणजेच ६० टक्के कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इन्सेंटिव्ह ठरविण्यास एआयचा वापर करण्यास तयार आहेत.

बॉसच्या हातातून बाजी निसटली! आता AI ठरवणार तुमचा पगार किती वाढणार, बोनस द्यायचा का नाही...
सध्या कर्मचारी वर्गाला पगारवाढीचे वेध लागले आहेत. जो-तो बॉससोबत चांगले वागण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आता जरी शक्य असले तरी आणखी काही वर्षांनी एआयच तुमचा पगार किती वाढवायचा, बोनस द्यायचा की नाही हे ठरविणार आहे. भारतात येत्या २-३ वर्षांत कंपन्या एआय बेस्ड प्रेडिक्टर मॉडेल वापरण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार १० पैकी ६ कंपन्या म्हणजेच ६० टक्के कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इन्सेंटिव्ह ठरविण्यास एआयचा वापर करण्यास तयार आहेत. हे सर्व तुमच्या कामानुसार ठरणार आहे. Future of Pay 2025 या अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.
येत्या काळात कंपन्या फिक्स्ड सॅलरी स्ट्रक्चर बाजुला ठेवण्याची शक्यता आहे. या कंपन्या एआयद्वारे आधीच अंदाज लावून रिअल टाईम सॅलरी रिव्हिजन्स करणार आहेत. एआयद्वारे ही केलेली पगाराची रचना अधिक खासगी आणि पारदर्शक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपन्या आपल्याकडील टॅलेंट राखण्यासाठी किंवा नवीन चांगल्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ही सिस्टिम वापरणार आहेत. यामुळे चांगले काम करून कमी पगार किंवा पगार वाढ, बोनस दिला जात असल्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बॉसच्या टट्टूंची खैर नाही...
अनेकदा चांगले काम करूनही पगारवाढ किंवा प्रमोशन डावलले जाते. या ऐवजी एखाद्या बॉसच्या खास व्यक्तीला पुढे केले जाते. त्याला जास्त पगारवाढ आणि प्रमोशन आदी दिले जाते. यामुळे कंपनीचा चांगला कर्मचारी दुखावला जातो, अनेकदा हे अन्याय झालेले कर्मचारी दुसरीकडे नोकरी पत्करतात. यामुळे कंपनीचे नुकसान होते. हे रोखण्याच्या दिशेने आता कंपन्या काम करत आहेत. EY च्या अहवालानुसार एआयद्वारे पगार ठरविण्याची ही प्रक्रिया २०२८ मध्ये दिसू शकते.
या वर्षी किती वेतनवाढ अपेक्षित...
२०२५ मध्ये ई-कॉमर्समध्ये १०.५ टक्के, वित्तीय सेवांमध्ये १०.३ टक्के, जागतिक क्षमता केंद्रांमध्ये १०.२ टक्के, आयटी क्षेत्रात ९.६ टक्के आणि आयटी-सक्षम सेवांमध्ये ९ टक्के वेतन वाढ होण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.
कंपन्याही आता स्मार्ट झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना टिकविण्यासाठी एआय, हायब्रिड वर्क मॉडेल्स आणि दीर्घकालीन प्रोत्साहने यासारख्या नवीन पर्यायांचा वापर करत आहेत. यामुळे कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचा दर हा २०२३ मध्ये १८.३ टक्क्यांवरून २०२४ मध्ये १७.५ टक्क्यांवर आला आहे.