Technology : उन्हाळ्यात मोबाईल स्फोटाचे प्रमाण जास्त; गॅझेटचे नियम पाळा, संभाव्य धोका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:13 IST2025-03-03T17:10:42+5:302025-03-03T17:13:03+5:30

Technology: तुम्ही पण रात्रभर फोन चार्जिंगला लावत असाल, तर आधी ती सवय बदला; जाणून घ्या गॅझेटचा स्फोट कशाने होतो आणि तो कसा टाळता येतो.

Technology: Follow the Gazette uses rule, avoid explosion specially in summer! | Technology : उन्हाळ्यात मोबाईल स्फोटाचे प्रमाण जास्त; गॅझेटचे नियम पाळा, संभाव्य धोका टाळा!

Technology : उन्हाळ्यात मोबाईल स्फोटाचे प्रमाण जास्त; गॅझेटचे नियम पाळा, संभाव्य धोका टाळा!

सध्या, मोबाईल फोन, इअरबड्स आणि नेक बँडसारखे इतर गॅझेट्स आपल्या सर्वांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण कधी-कधी या उपकरणांच्या स्फोटाच्या घटनाही समोर येतात, ज्यामुळे साहजिकच आपल्यालाही भीती वाटते. मात्र आपण बातमी वाचतो आणि थोड्या वेळाने विसरून जातो. याबाबतीत आपले गॅझेट्स स्फोट होण्यापासून कसे वाचवायचे त्यासंदर्भात दिलेली माहिती कायमस्वरूपी लक्षात ठेवा. 

हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात दररोज फोन किंवा इअरबड्सच्या स्फोटाच्या अधिक बातम्या येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या उपकरणांना आग कशी लागते? या लेखात आम्ही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्फोट कधी आणि का होतो हे सांगणार आहोत. जर तुम्हाला या धोक्यापासून स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर तुम्ही पुढील काळजी घ्या. 

कशामुळे होतो स्फोट? 

या उपकरणांचा उपयोग आपले जीवन सुकर करण्यासाठी केला जातो. परंतु तुम्ही ही उपकरणे सतत चार्ज केल्यास किंवा दीर्घकाळ वापरल्यास स्फोटाचा धोका वाढू शकतो. आता प्रश्न पडतो की या सर्व उपकरणाचे स्फोट का होतात? कारण, बहुतेक उपकरणांमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरल्या जातात. त्या जास्त गरम होऊन फुटू शकतात. बॅटरीमधील दोष, जास्त तापमान किंवा चुकीच्या चार्जिंगच्या सवयी या घटनांना कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय स्वस्त किंवा दर्जेदार नसलेल्या बॅटरीमुळेही स्फोट होऊ शकतो.

स्फोटापासून डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

जास्त चार्जिंग टाळा-

बरेच जण रात्रभर फोन चार्जिंगला ठेवतात. ही सवय वाईट आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर कोणतेही गॅझेट जास्त काळ चार्जिंगवर ठेवणे धोकादायक ठरते. असे केल्याने अतिरिक्त चार्जिंगमुळे बॅटरी गरम होऊन तिचा स्फोट होऊ शकतो. 

ब्रँडेड चार्जरचा वापर :

तुमचा फोन, लॅपटॉप किंवा इतर डिव्हाइस चार्ज करण्यासाठी, त्याचा मूळ चार्जर वापरा. चार्जर हरवला किंवा खराब झाला असेल तर अशा परिस्थितीत नवीन चार्जर खरेदी करताना ओरिजनल चार्जर घ्या. चार पैसे जास्त जातील पण भविष्यातील धोका टळेल. स्वस्त किंवा नॉन-ब्रँडेड चार्जर वापरल्याने बॅटरी उशिरा चार्ज होते, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.

बॅटरीच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या : 

गॅझेटची बॅटरी वेळोवेळी तपासा. बॅटरीमध्ये काही दोष दिसल्यास, त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्वरित बदला. बऱ्याच वेळा खराब बॅटरी हे यंत्राचा स्फोट होण्याचे कारण असते. डिव्हाइसची बॅटरी जास्त गरम होत असल्यास, ती त्वरित बदला.

डिव्हाइस सुरक्षित ठेवा : 

तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अति उष्णता आणि थंडीपासून संरक्षण करा. उन्हात किंवा वाहनाच्या आत ठेवून जाऊ नका. जास्त तापमानामुळे बॅटरी खराब होऊ शकते आणि तिचा स्फोट होऊ शकतो. बॅटरीमध्ये दोष असू शकतात, ज्यामुळे स्फोट होऊ शकतो. ही उपकरणे कव्हर घालून झाकून ठेवा. विशेषत: स्मार्टफोन आणि टॅब्लेट.

बॅटरी संपण्यापूर्वी चार्ज करा : 

अनेक जण बॅटरी संपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत फोन वापरतात. या सवयीमुळे तुमच्या डिव्हाइसचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत तिचा वापर करणे टाळा. बॅटरी २० टक्क्यांच्या खाली आणि ८० टक्क्यांच्या वर जाता कामा नये. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिव्हाइस असल्यास, ते सर्व एकाच वेळी चार्ज करणे टाळा. योग्य वेळी चार्ज करा आणि प्रत्येक डिव्हाइस स्वतंत्रपणे चार्ज करा.

Web Title: Technology: Follow the Gazette uses rule, avoid explosion specially in summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.