गोष्ट नऊ वर्षांपूर्वीची. आम्ही ओपन एआय सुरू केले होते. हे तंत्रज्ञान सर्वांत प्रभावी ठरेल, एवढाच विश्वास होता. यापलिकडे कोणतीही जाणीव नव्हती. इतिहासात योगदान देण्याची संधी होती. आम्ही कामाला लागलो. सर्वोत्कृष्ट संशोधनासाठी झोकून द्यावे लागणार, एवढेच माहित होते. पण प्रश्न अनेक होते. भांडवल कसे आणायचे? नव्या गोष्टी उभारायच्या कशा? शिवाय अंतर्गत संघर्ष, तो वेगळाच. अपयश येईल याची जाणीवही नव्हती. मोठी स्वप्न घेऊन, तेवढ्याच विश्वासाने हा प्रवास सुरू केला. या प्रक्रियेत काही खूप कठीण वळणंही आली. काही सहकारी आम्हाला सोडून स्वतः आमच्याच स्पर्धेत उतरले. संशय घेणारे अनेक लोक होते. आता ते
विश्वासू बनलेत. हार मानली नाही. भविष्यातही अशा अनेक गोष्टी असतील, ज्या आज कल्पनेपलीकडच्या आहेत. त्यामुळे अजून भरपूर काम करायचे आहे.
मोठी कंपनी उभी करायची असेल, तर शॉर्टकट नको...
अविरत शिकत राहा : अजूनही खूप काही शिकायचे आहे. तुम्ही कितीही मोठे यश मिळवले तरी, नवीन शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा.
जबाबदारीची जाणीव : ओपन एआय ही मानवतेसाठी जबाबदारीने काम करणारी संस्था आहे. केवळ यश मिळवण्यापेक्षा, समाजासाठी चांगले काही करण्याचा दृष्टिकोन ठेवा.
शॉर्टकट नसतो : वेगाने काम करा, लोक शॉर्टकट शोधत असतात, पण मोठी कंपनी उभी करायची असेल, तर मेहनतीला पर्याय नाही.
ही तीन तत्त्वे बदलू शकतात आयुष्य
महत्त्वाकांक्षी स्वप्न बाळगा : मानवासारखी बुद्धिमान यंत्रणा तयार होऊ शकते, अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवला. लोकांचा विरोध अन् नकारात्मकता असुनही ध्येय सोडले नाही.
धैर्य आणि चिकाटी ठेवा : प्रवासात चढ-उतार आले, सहकाऱ्यांनी सोडून दिले. पण वाटचाल थांबवली नाही. सुरुवातीला लोक हसतील, पण तुम्ही यशस्वी झालात की तेच कौतुक करतील.
योग्य लोकांची साथ हवी : यशासाठी तुमच्या आजूबाजूला सकारात्मक आणि तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवणारे लोक असावेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आधार देणारे लोक असावेत.
(संकलन : महेश घोराळे)