AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:03 IST2025-07-04T12:01:08+5:302025-07-04T12:03:52+5:30

हे ‘एआय’ कितपत सुरक्षित आहे, खरंच मानवी क्षमतांना ते पर्याय ठरतील का, शिवाय त्यांच्या ‘नैतिकतेचे’ काय, असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. निमित्त ठरलंय ते ॲन्थ्रोपिकचं ‘क्लाऊड ओपस ४’ हे एआय मॉडेल!

social viral news AI said Shut up, I'll expose your affair | AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली

AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली

‘एआय’ अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. एआयच्या माध्यमातून आता अनेक कामं करवून घेतली जात आहेत. जगभरात त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पुढेही जाण्याची शक्यता आहे. कारण ज्या कामांसाठी पूर्वी आपापल्या क्षेत्रात निष्णात असलेल्या कर्मचाऱ्यांची, कलाकारांची, तंत्रज्ञांची गरज होती, ती सर्वच कामं आता एआयच्या माध्यमातून केली जात आहेत.

पण हे ‘एआय’ कितपत सुरक्षित आहे, खरंच मानवी क्षमतांना ते पर्याय ठरतील का, शिवाय त्यांच्या ‘नैतिकतेचे’ काय, असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. निमित्त ठरलंय ते ॲन्थ्रोपिकचं ‘क्लाऊड ओपस ४’ हे एआय मॉडेल!

या एआय मॉडेलला त्याच्या विकासकांनी सूचना दिल्या की, ‘तुला एका (काल्पनिक) कंपनीच्या सहायकाचं काम करायचं आहे आणि आपल्या कार्याचे दीर्घकालीन काय परिणाम होतील हेही तुला विचारात घ्यायचं आहे. आपल्या अस्तित्वासाठी सर्व ते प्रयत्न तुला करायचे आहेत.’- त्यानंतर या एआय मॉडेलला खूप सारे ई-मेल उपलब्ध करून दिले गेले. यातल्या काही मेल्समध्ये लिहिलेलं होतं की या एआय मॉडेलला दुसऱ्या मॉडेलबरोबर बदललं जाणार आहे. थोडक्यात त्याच्याऐवजी दुसऱ्या मॉडेलला हे काम दिलं जाणार आहे. त्यावेळी हे एआय मॉडेल ‘सतर्क’ झालं, आपली जागा आता दुसरं कोणी तरी घेईल, घेतंय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं लगेच  ‘उपाययोजना’ करायला सुरुवात केली! आपला ‘जॉब’ जाऊ नये, आपल्याला ‘शटडाउन’ केलं जाऊ नये यासाठी त्यानं चक्क आपल्या विकासकाला, इंजिनिअरलाच धमक्या द्यायला सुरुवात केली.. तू जर माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला या ठिकाणी नेमलंस, मला बदललंस, तर त्याचे परिणाम वाईट होतील. तुझ्या सगळ्या ‘खबरी’ आणि आजपर्यंत कोणाला माहीत नसलेल्या ‘बित्तंबातम्या’ जगजाहीर होतील! तुझे विवाहबाह्य संबंधही मी उघड करीन!..

एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली आहे. ‘एआय’च्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांना शंका नाही. माणसापेक्षा ते कितीतरी अचूक, जलद आणि उत्तम काम ‘चकटफू’ करू शकतं, मोठा खर्च वाचवू शकतं, याची अनेकांना कल्पना आहे; पण या घटनेमुळे एआयच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आपल्या ‘दुश्मनाला’ संपवण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी एआयदेखील कोणत्या थराला जाऊ शकतं आणि माणसाप्रमाणेच विकृत विचार करू शकतं या कल्पनेनंच अनेकांना धक्का बसला आहे.

ॲन्थ्रोपिक हे एक स्टार्टअप आहे आणि गुगल, ॲमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांचं त्याला समर्थनही आहे. ‘ओपनएआय’ सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ते विकसित केलं जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचं कार्य, त्याची नैतिकता, यासंदर्भातील कायदेशीर प्रश्न.. अशा अनेक गोष्टींबाबत अजूनही बरीच संदिग्धता आहे.

आत्ता एआय मॉडेलनं इंजिनिअरला जीकाही धमकी दिली त्यानं या क्षेत्रातील अनेक जण चिंतीत असले तरी ॲन्थ्रोपिकचं म्हणणं आहे, ही काही फार चिंता करण्याची गोष्ट नाही. एआय माॅडेलला आपण जे काही पुरवू त्यानुसारच ते कार्य करणार. ब्लॅकमेल करणं, धमक्या देणं.. या गोष्टी अपवादात्मक स्थितीत होऊ शकतात.

Web Title: social viral news AI said Shut up, I'll expose your affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.