सोशल अॅप्सचा ‘फास’ दिवसेंदिवस घट्ट होतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 05:58 IST2019-01-16T05:58:37+5:302019-01-16T05:58:46+5:30
पालकांनो सावधान : अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक, कोवळ्या वयात हाती फोन आल्याचा परिणाम

सोशल अॅप्सचा ‘फास’ दिवसेंदिवस घट्ट होतोय!
मुंबई : टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ टाकण्यास विरोध केल्याने, सोमवारी भोईवाड्यात १५ वर्षीय मुलीने वडिलांच्या वाढदिवशीच आत्महत्या केली. या प्रकारामुळे किशोरवयीन मुलांवर समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोवळ्या वयातच हातात स्मार्ट फोन आल्यामुळे सोशल मीडियाच्या जाळ्यात अल्पवयीन मुले भरकटताना दिसत आहेत. फसवणुकीबरोबरच सायबर गुन्ह्यांतही मुले ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत आहेत. शिवाय विविध अॅप्सचा ‘फास’ही दिवसेंदिवस घट्ट होत असून, यामध्ये दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब या सोशल साइट्सह टिक-टॉक, माय फोटोज, लाइक व्हिडीओ, वी लाइक, टिंडर सारख्या अनेक अॅप्सना मुले पसंती देत आहेत. दिवसभरात नवनवीन कपडे बदलायचे, मेकअप करून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करण्याचे त्यांना जणू व्यसनच
जडले आहेत. अनेकदा या फोटो, व्हिडीओचा ठग मंडळी फायदा उचलतात.
भोईवाडा येथे आत्महत्या केलेल्या मुलीलादेखील टीक-टॉकवर व्हिडीओ टाकण्याची सवय लागली होती. दिवसाला ५ ते ६ वेळा वेगवेगळे व्हिडीओ करून ती पोस्ट करत असे. वडिलांच्या वाढदिवशीही ती प्रत्येक्ष क्षण व्हिडीओ करून पोस्ट करत असल्याने आजीने हटकले. व्हिडीओ करण्यास मज्जाव केला. याच रागात बाथरूममध्ये जाऊन तिने गळफास घेतला. अशा घटनांपासून धडा घेत पालकांनी वेळीच सावध होत, त्यांना चूक काय? बरोबर काय? याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. दिवसाला अशा स्वरूपाची अनेक प्रकरणे घेऊन पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे येत असल्याचे डॉ. सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
...म्हणून गाठतात टोकाचे पाऊल
सोशल मीडियावर तत्काळ मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अल्पवयीन मुले त्याकडे ओढली जातात. दिवसभर १० व्हिडीओ, फोटो टाकून त्याला लाइक्स मिळत नसतील, तर नैराश्येत जातात. सहनशक्ती, प्रतीक्षा करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मुलांची चिडचिड होते, स्वभाव तापट होतो. याच तापट स्वभावात ते टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ
परिस्थिती समजून घ्या
पालकांनी सुरुवातीपासूनच मुलांच्या प्रत्येक सवयींवर लक्ष ठेवायला हवे. मोबाइलच्या वापरावर निर्बंध आणावे. त्यांना प्रत्येक गोष्टींचा काय आणि कशासाठी उपयोग आहे? याची जाणीव करून द्या. मुलांसाठी काही नियम वेळीच ठरवायला हवेत. ते नियम पालकांनाही लागू होतात. कारण पालकच त्यांचे आयडॉल असतात आणि पाल्य त्यांचेच अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी त्याची काळजी घ्यायला हवी. पाल्यांसोबत संवाद वाढवावा.
- उन्मेश जोशी, संचालक, रिस्पॉन्सिबल नेटिजम प्रोजेक्ट