विदर्भात अवकाळी पाऊस
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
पुणे : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगावू लागले आहे. आज दिवसभरात विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात आज थोडी घट झाली.
विदर्भात अवकाळी पाऊस
पुणे : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगावू लागले आहे. आज दिवसभरात विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात आज थोडी घट झाली.आज सायंकाळी साडेपाचपर्यंत नागपूर येथे ३ मिमी तर ब्रम्हपूरी येथे २ मिमी पाऊस पडल्याची नोंद वेधशाळांमध्ये झाली. याव्यतिरिक्त आणखी काही भागांमध्ये हलका पाऊस झाला. मात्र त्याची नोंद झाली नाही. विदर्भातील ढगाळ हवामानाचे ढग आज राज्यभर पसरले होते. त्यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली. दोन दिवसांपूर्वी ३९ अंशापर्यंत वाढलेले शहराचे तापमान आज घटून ३७ अंशाच्या घरात आले. राज्यात सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान आज ३४ अंशाच्या वर होते. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही आज मोठी वाढ झाली. यामुळे दिवसा जाणवणारा उकाडा रात्रीही जाणवू लागला आहे.पुढील २४ तास विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.दरम्यान, आज पुण्याच्या तापमानात घट झाली. कमाल तापमान ३४.३ अंश तर किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तापमानात थोडी घट झाली असली तरी शहरात उकाडा जाणवत होता. शहरातील हवामान कोरडे राहणार असल्यामुळे तापमानात पुढील २४ तासात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.३, जळगाव ३५.२, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर २९.७, मालेगाव ३५.५, नाशिक ३३.६, सांगली ३५, सातारा ३४.३, सोलापूर ३६.६, मुंबई २९.२, अलिबाग २८.७, रत्नागिरी ३१.३, डहाणू २८.८, उस्मानाबाद ३५.४, औरंगाबाद ३४.४, परभणी ३५.२, अकोला ३५.२, अमरावती ३४, बुलडाणा ३३, ब्रम्हपूरी ३४.८, चंद्रपूर ३४, नागपूर ३३.२, वाशिम ३४.८, वर्धा ३३.८, यवतमाळ ३२.८.