देशात इंटरनेट युजर्संच्या संख्येत 2023 पर्यंत 40 टक्के वाढ होईल - रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:23 IST2019-04-25T17:22:24+5:302019-04-25T17:23:37+5:30
देशात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवर वाढताना दिसत आहे.

देशात इंटरनेट युजर्संच्या संख्येत 2023 पर्यंत 40 टक्के वाढ होईल - रिपोर्ट
नवी दिल्ली : देशात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवर वाढताना दिसत आहे. इंटरनेट डेटाच्या किंमतीत होणारी घट पाहता 2023 पर्यंत भारतात जवळपास 40 टक्के युजर्संची संख्या वाढेल, तर स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल, असे मॅकिन्से ग्लोबल इंस्टिट्यूटच्या एका अहवालातून समोर आले आहे.
अहवालानुसार, मुख्य डिजीटल क्षेत्रात 2025 पर्यंत दुप्पट वाढ होऊन 355 ते 435 अब्ज डॉलर होईल. मॅकिन्से ग्लोबल इंस्टिट्यूटच्या अहवालात ‘डिजिटल इंडिया-टेक्नॉलजी टू ट्रान्सफॉर्म अ कनेक्शन नेशन'मध्ये म्हटले आहे की, भारत डिजिटल ग्राहकांसाठी एक सर्वात मोठे मार्केट आहे. भारतात 2018 पर्यतं इंटरनेटचे 56 कोटी युजर्स होते, ते फक्त चीनपेक्षा कमी आहेत. भारतात मोबाईल डेटा युजर्स सरासरी प्रति महिना 8.30 जीबी डेटा वापर करत आहेत. तर चीनमध्ये सरासरी 5.50 जीबी आणि दक्षिण कोरियासारख्या प्रगत डिजिटल मार्केटमध्ये 8 ते 8.5 जीबी आहे.
दरम्यान, देशात मोबाईल डेटाचे दर रिलायन्स जियो लाँन्च झाल्यानंतर खूप कमी झाले आहेत आणि हे नाकारता येणार नाही. रिलायन्स जियोने 5 सप्टेंबर, 2016 ला भारतीय मार्केटमध्ये पाऊल टाकले, त्यानंतर इंटरनेटच्या किंमतीत मोठी घट झाली. याआधी भारतात 1जीबी 3जी डेटा साठी सरासरी 250 ते 300 रुपये प्रति महिना द्यावे लागत होते. 2जी दर तेव्हा 100 रुपये महिना होते. रिलायन्स जियो आल्यानंतर एयरटेल, आयडिया आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांनीही मोबाईल डेटाचे दर कमी केले.