31 ऑक्टोबरला येणार नोकियाचा नवीन स्मार्टफोन
By शेखर पाटील | Updated: October 24, 2017 15:28 IST2017-10-24T10:46:22+5:302017-10-24T15:28:32+5:30
एचएमडी ग्लोबल कंपनीने ३१ ऑक्टोबर रोजी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले असून या कार्यक्रमात अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या नोकिया ९ या मॉडेलचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे.

31 ऑक्टोबरला येणार नोकियाचा नवीन स्मार्टफोन
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया या ब्रँडचे पुनरूज्जीवन केले असून एकामागून एक नवनवीन मॉडेल्स सादर करण्याचा सपाटाचा लावला आहे. या अनुषंगाने ३१ ऑक्टोबर रोजी ही कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आले आहे. यात नेमके कोणते मॉडेल लाँच होईल? याबाबत माहिती दिलेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात नोकिया ७ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहे.
नोकिया ७ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा व १०८० बाय १९२० पिक्सल्स (फुल एचडी क्षमतचा) २.५ डी आयपीएस डिस्प्लेने देण्यात आले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारा असेल.
नोकिया ७ या स्मार्टफोनमध्ये झेईस लेन्सयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्युअल टोन फ्लॅश, एफ/१.८ अपार्चर तसेच ८० अंशातील वाईड अँगल व्ह्यूने सज्ज असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी या मॉडेलमध्ये एफ/२.० अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात बोथी इफेक्ट असल्यामुळे एकचदा मुख्य आणि फ्रंट कॅमेरा वापरता येईल. यामध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, युएसबी टाईप-सी, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. २४ ऑक्टोबरपासून नोकिया ७ हा स्मार्टफोन चीनमध्ये मिळणार असल्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे.
यानंतर लागलीच ३१ ऑक्टोबरला हा स्मार्टफोन भारतात दाखल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये याचे ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट लाँच असून याचे भारतीय रूपयातील अंदाजे मूल्य अनुक्रमे २४,५०० आणि २६,५०० रूपये आहे. यातील नेमके कोणते व्हेरियंट भारतात सादर होईल याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.