नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल
By शेखर पाटील | Updated: January 8, 2018 09:42 IST2018-01-08T09:40:04+5:302018-01-08T09:42:13+5:30
एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला नोकिया ७ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची तयारी सुरू केली असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल
गत ऑक्टोबर महिन्यात एचएमडी ग्लोबल कंपनीने मिड रेंजमधील नोकिया 7 हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली होती. याचे 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट सादर करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. याचे मूल्य 20 ते 22 हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता असून हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून मिळणार असल्याची माहिती लीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे.
नोकिया 7 हा स्मार्टफोन 5.2 इंच आकारमानाच्या व 1080 बाय 1920 पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेच्या 2.5 डी आयपीएस डिस्प्लेने सज्ज असेल. यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण तसेच अॅल्युमिनियमची मजबूत बॉडी प्रदान करण्यात आली आहे. नोकिया ७ हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने युक्त असेल. यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट 7.1.1 या आवृत्तीवर चालणारा असेल.
नोकिया 7 या स्मार्टफोनमध्ये झेईस लेन्स प्रदान करण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्युअल टोन फ्लॅश, एफ/1.8 अपार्चर तसेच 80 अंशातील वाईड अँगल व्ह्यूने सज्ज असेल. यातून 30 फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीच्या फोर-के व्हिडीओचे चित्रीकरण करता येईल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी नोकिया 7 या मॉडेलमध्ये एफ/2.0 अपार्चरयुक्त 5 मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात बोथी इफेक्ट हे फिचर दिलेले असून याच्या अंतर्गत एकचदा मुख्य आणि फ्रंट कॅमेरा वापरता येईल. हे नोकिया 7 स्मार्टफोनचे वैशिष्ट्य मानले जात आहे. नोकिया 7 मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, युएसबी टाईप-सी, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.