'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:50 IST2025-10-27T11:49:53+5:302025-10-27T11:50:14+5:30
Call Merging Scam Alert: 'कॉल मर्जिंग स्कॅम' या नवीन सायबर फसवणुकीत OTP कसा चोरला जातो? स्कॅमरची कार्यपद्धती आणि या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी NPCI ने दिलेल्या तातडीच्या सूचना मराठीत वाचा.

'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
नवी दिल्ली: मिस्ड कॉल फ्रॉड आणि डिजिटल अटक यांसारख्या सायबर फसवणुकीचे प्रकार आता मागे पडू लागले आहेत. आता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक नवा आणि अतिशय धोकादायक मार्ग शोधला आहे, तो म्हणजे 'कॉल मर्जिंग स्कॅम' (Call Merging Scam). नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि प्रमुख बँकांनी या नवीन फसवणुकीबद्दल नागरिकांना तातडीचा इशारा जारी केला आहे.
या स्कॅममध्ये, सायबर चोरटे 'कॉल मर्ज' किंवा 'कॉन्फरन्स कॉल' या सामान्य मोबाईल फीचरचा गैरवापर करून नकळतपणे वन-टाइम पासवर्ड मिळवतात आणि काही सेकंदांतच खाते रिकामे करतात.
'कॉल मर्जिंग स्कॅम' नेमका कसा चालतो?
कॉल मर्जिंग स्कॅम हा सोशल इंजिनिअरिंग तंत्रावर आधारित आहे, जो सामान्यतः खालीलप्रमाणे होतो:
स्कॅमर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल करतो आणि सांगतो की तुमचा नंबर त्याला तुमच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा मित्राकडून मिळाला आहे. तो बोलण्यातून तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर, स्कॅमर तुम्हाला सांगतो की तो 'मित्र' दुसऱ्या नंबरवरून तुम्हाला कॉल करत आहे आणि तुम्हाला कॉल मर्ज करण्याची विनंती करतो.
इथेच फसतो...
प्रत्यक्षात, हा 'दुसरा कॉल' मित्राचा नसतो, तर तो तुमच्या बँक खात्यातून एखादा व्यवहार सुरू करण्यासाठी मागवलेला बँकेचा स्वयंचलित OTP व्हेरिफिकेशन कॉल असतो. तुम्ही जसा कॉल मर्ज करता, तसा बँकेचा OTP कॉलही तुमच्या संभाषणात जोडला जातो. तुमची माहिती त्याने आधीच इटरनेटवरून मिळवून टाकलेली असते, तो फक्त ओटीपीची वाट पाहत असतो. कॉलवरील ओटीपी ऐकताच तो टाकतो आणि लगेचच तुमच्या खात्यातून पैसे वळते केले जातात.
सावध तो सुखी...
अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही कॉलसोबत दुसरा कॉल मर्ज करण्याची विनंती केल्यास, त्याला त्वरित नकार द्या. जर कोणी बँक अधिकारी किंवा ओळखीच्या व्यक्तीचा हवाला देत असेल, तर कॉल कट करून अधिकृत कस्टमर केअर नंबरवर किंवा त्या मित्राला दुसऱ्या माध्यमातून संपर्क करून ओळख पडताळून पाहा. बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था तुम्हाला फोनवर ओटीपी (OTP) किंवा पिन (PIN) कधीही विचारत नाही. असा कोणताही प्रश्न विचारल्यास तो स्कॅम समजा. तुम्हाला न केलेल्या व्यवहाराचा OTP आल्यास किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाल दिसल्यास, त्वरित आपल्या बँकेला कळवा आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन (National Cybercrime Helpline) १९३० वर तक्रार नोंदवा.