मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:24 IST2026-04-11T15:22:55+5:302026-04-11T15:24:49+5:30

जुना फोन भंगारात देण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

Mobile sold and bank account emptied? Kanpur police uncover new cyber crime racket | मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट

मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट

तुमच्या घरातील जुना किंवा खराब झालेला मोबाईल तुम्ही भांडी किंवा काही रुपयांच्या मोबदल्यात भंगारवाल्याला देत असाल, तर सावधान! तुमचा हाच जुना फोन सायबर भामट्यांच्या हाती लागून तुमच्यासह इतरांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी वापरला जाऊ शकतो. कानपूर पोलिसांनी नुकताच एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी भंगारातील जुन्या मोबाईलचे सुटे भाग वापरून गुन्हे करत होती. याप्रकरणी पोलिसांनी २० सायबर गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

भंगारवाल्यापासून सायबर ठकांपर्यंतचा प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गल्लीबोळात फिरणारे भंगारवाले जुने मोबाईल गोळा करतात आणि ते या संघटित टोळीला विकतात. हे ठग त्या जुन्या मोबाईलमधील महत्त्वाचे पार्ट काढून कस्टमाइज्ड मोबाईल तयार करतात. या उपकरणांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. अटक केलेल्या आरोपींकडून १७ अँड्रॉइड फोन, ४ कीपॅड फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली आहेत.

५० हजारांपर्यंत विकले जातात जुगाड फोन

एडीसीपी सुमित रामटेके यांनी सांगितले की, हे ठक जुन्या भागांपासून बनवलेले फोन ५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत सायबर गुन्हेगारांना विकतात. या फोनमध्ये अनेक सिम कार्ड वापरण्याची सुविधा असते आणि व्हीपीएनद्वारे लोकेशन लपवले जाते. यामुळे पोलिसांना त्यांचा मागोवा घेणे कठीण होते. धक्कादायक म्हणजे, या जुन्या फोनच्या मेमरीमधून तुमचा खाजगी डेटा (फोटो, पासवर्ड) रिकव्हर करून तुम्हाला ब्लॅकमेल देखील केले जाऊ शकते.

तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

सायबर तज्ज्ञ अमित शर्मा यांच्या मते, गुन्हेगार या उपकरणांमध्ये अशा ॲप्सचा वापर करतात जे व्हर्च्युअल नंबर पुरवतात. त्यामुळे त्यांचा आयएमईआय नंबर ट्रेस करणे मोठे आव्हान ठरते.

मोबाईल देण्यापूर्वी 'हे' नक्की करा:

- मोबाईल पूर्णपणे 'फॅक्टरी रिसेट' करा.

- सर्व सोशल मीडिया आणि बँक अकाउंट्समधून लॉग आऊट करा.

- तुमचे मेमरी कार्ड आणि सिम कार्ड काढून घ्या.

- शक्य असल्यास जुना मोबाईल अधिकृत रिसायकलिंग सेंटरकडेच द्या.

तुमची छोटीशी निष्काळजी तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. त्यामुळे जुना मोबाईल भंगारात देताना शंभरवेळा विचार करा!

Web Title : पुराने मोबाइल से साइबर अपराध: कानपुर पुलिस ने रैकेट का भंडाफोड़ किया

Web Summary : कानपुर पुलिस ने पुराने मोबाइल फोन का उपयोग करके साइबर अपराध करने वाले गिरोह का पर्दाफाश किया। अपराधी व्यक्तिगत डेटा तक पहुंचने और ब्लैकमेल करने के लिए भागों का पुन: उपयोग करते हैं। शोषण से बचने के लिए डिवाइस को रीसेट करने की सलाह दी जाती है।

Web Title : Old Mobiles Fuel Cybercrime: Kanpur Police Bust Recycling Racket

Web Summary : Kanpur police uncovered a cybercrime ring using discarded mobile phones. Criminals repurpose parts for scams, accessing personal data and blackmailing victims. Experts advise factory resetting devices and removing SIM cards before disposal to prevent exploitation.