तुमचं Pan Card हरवलं? काळजी सोडा; ‘ही’ सोपी प्रक्रिया करा, काही मिनिटांत नवं मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 21:42 IST2022-02-08T21:42:05+5:302022-02-08T21:42:43+5:30
अत्यंत आवश्यक असलेले पॅनकार्ड अनावधानाने हरवले तर काय करायचे, असा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो.

तुमचं Pan Card हरवलं? काळजी सोडा; ‘ही’ सोपी प्रक्रिया करा, काही मिनिटांत नवं मिळवा
नवी दिल्ली: भारतात कोणत्याही आर्थिक किंवा अन्य व्यवहारांसाठी पॅनकार्ड (Pan Card) हे अत्यंत आवश्यक असलेले महत्त्वाचे कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारी कामकाजापासून ते अगदी बँकिंग व्यवहारांपर्यंत अनेकविध ठिकाणी पॅनकार्ड ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते. याशिवाय अनेक ठिकाणी पॅनकार्ड लिंक करण्यासही सांगितले जाते. मात्र, असे अत्यंत आवश्यक असलेले पॅनकार्ड अनावधानाने तुमच्याकडून हरवले तर काय करायचे, असा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. पण काळजी करू नका. एक सोपी प्रक्रिया करून तुम्ही पॅनकार्ड मिळवू शकता.
तुम्हाला तुमच्या पॅनकार्डचा क्रमांक आठवत असेल, तर काही प्रश्न नाही. मात्र, काहीच आठवत नसेल, तरी गोंधळून जायचे कारण नाही. तुम्ही आधारकार्डच्या मदतीने पॅनकार्ड मिळवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते पॅनकार्ड ई-स्वरुपातील म्हणजेच ई-पॅनकार्ड असेल. ऑनलाइन प्रक्रिया करून ई-पॅन कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता. परंतु, आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक असणे यासाठी आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी लिंक नसतील, तर ई-पॅनकार्ड डाऊनलोड करता येऊ शकणार नाही.
नेमकी कोणती प्रक्रिया करावी?
- सर्वप्रथम आयकर वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉग इन करा.
- यानंतर ‘इन्स्टंट ई पॅन’ या पर्यायावर क्लिक करा.
- या प्रक्रियेनंतर ‘New E PAN’ पर्याय निवडा.
- तुम्ही तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा.
- तुम्हाला तुमचा पॅनकार्ड क्रमांक आठवत नसेल, तर आधार कार्ड क्रमांक टाका.
- या प्रक्रियेसाठी काही नियम आणि अटी दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचाव्यात.
- ती प्रक्रिया मान्य असेल, तर पुढे ‘Accept’ वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे सादर करावा.
- आता दिलेले तपशील वाचल्यानंतर ‘Confirm’ करा.
- तुमचे पॅनकार्ड तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर PDF फॉरमॅटमध्ये पाठवले जाईल.
- यानंतर तुम्ही तुमचे ‘ई-पॅन’ डाउनलोड करू शकता.