एका फोनसाठी करावे लागेल ७२४ तास काम; ३८ देशांमध्ये करण्यात आला सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 07:46 IST2021-10-04T07:45:36+5:302021-10-04T07:46:18+5:30
भारतीयांना आयफोन-१३ खरेदी करायचा असेल तर त्यांना वर्षातील ९० दिवस म्हणजेच ७२४ तास सलग काम करावे लागेल

एका फोनसाठी करावे लागेल ७२४ तास काम; ३८ देशांमध्ये करण्यात आला सर्व्हे
आयफोन-१३ खरेदी करण्यासाठी किती तास काम करणे गरजेचे आहे, यावर अलीकडेच ३८ देशांमध्ये सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार भारतीय लोकांना आयफोन-१३ खरेदी करण्यासाठी ७२४ तास काम करावे लागेल, असे स्पष्ट झाले. कष्टाळू भारतीय आधीच जगात सर्वाधिक तास काम करत असल्याचे अलीकडेच स्पष्ट झाले. तेव्हा त्यांना आयफोन-१३ साठी अधिक कष्ट घ्यावे लागतील, असेच दिसत आहे.
अनेक कारणांमुळे विविध देशांमध्ये आयफोनची किंमत वेगवेगळी असते. त्यात प्रामुख्याने आयातशुल्क, कररचना आणि चलनाचे दर इत्यादींचा समावेश असतो. या आधारावर प्रत्येक देशातील व्यक्तीचे मासिक उत्पन्न आणि प्रतिदिन ८ तास काम करण्याचे बंधन यावर काही गणितीय सूत्रांची मांडणी करण्यात आली. त्यानुसार भारतीय व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न ४४९ डॉलर म्हणजे ३३ हजार ३९१ रुपये आहे. इतर देशांच्या तुलनेत हे उत्पन्न खूपच कमी आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत भारतीयांना आयफोन महाग पडतो.
जास्त काम करणे भाग
भारतीयांना आयफोन-१३ खरेदी करायचा असेल तर त्यांना वर्षातील ९० दिवस म्हणजेच ७२४ तास सलग काम करावे लागेल, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. आयफोन खरेदीसाठी जास्त वेळ काम करावे लागणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर फिलिपाइन्स आहे.