फ्लॉवर नहीं, फायर है... रील्स अन् शॉर्ट व्हिडीओचं 'बिझनेस मॉडेल'; नाव अन् पैसेही कमवा, पण... 

By अमेय गोगटे | Published: February 7, 2022 07:30 PM2022-02-07T19:30:35+5:302022-02-07T19:32:28+5:30

एखाद्या गाण्याचा शॉर्ट व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि तो क्रिएटर रातोरात स्टार झाला, अशी उदाहरणं आपण बघतो. अशी एखादी बातमी वाचून अनेक तरुण लगेच स्वतःचा एखादा व्हिडीओ तयार करतात आणि लाईक्सची वाट बघत बसतात. पण, तसं नसतं मित्रहो.

how to earn money by making reels or short videos | फ्लॉवर नहीं, फायर है... रील्स अन् शॉर्ट व्हिडीओचं 'बिझनेस मॉडेल'; नाव अन् पैसेही कमवा, पण... 

फ्लॉवर नहीं, फायर है... रील्स अन् शॉर्ट व्हिडीओचं 'बिझनेस मॉडेल'; नाव अन् पैसेही कमवा, पण... 

googlenewsNext

>> अमेय गोगटे

तुम्ही 'पुष्पा' पाहिला असेलच. आरारारा, पार 'याड' लावलंय राव या सिनेमानं. छोटी छोटी पोरंही, एक खांदा उंचावून, नसलेल्या दाढीवरून (हनुवटीवरून) हात फिरवत, 'मैं झुकेगा नही', असं ठणकावताना दिसताहेत. (तरी बरं, हल्ली शाळांमध्ये ओणवं उभं राहायची शिक्षा देत नाहीत. नाहीतर, तिथेही एखाद्या 'पुष्पराज'नं टीचरना हे ऐकवलं असतं हो!)

'पुष्पा'ची ही अशी क्रेझ असताना इन्स्टा रील्स आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारे मागे कसे राहतील? त्यांची कलाकारी तुम्ही पाहिली असेलच. मी तर परवा एक व्हिडीओ बनताना पाहिला. भाजीच्या दुकानात. भाजीवाला पुष्पाच्या वेशभूषेत... एक मुलगा दुकानात येतो... टोपलीकडे हात दाखवत 'फ्लॉवर कैसा दिया' विचारतो... हे ऐकून 'पुष्पा' घुश्श्यात म्हणतो, 'आकार देख के फ्लॉवर समझा क्या?... फ्लॉवर नही, ब्रोकोली है ये... सस्ते में बेचेगा नहीं!'

हे असे 'कलाकार' हल्ली बऱ्याच ठिकाणी दिसतात. कधी वेडेवाकडे चेहरे करत, कधी एकदम चिडून किंवा हसून, कधी लाजून, काहीतरी पुटपुटत हे 'वेडे' मोबाईलवर शूटिंग करत असतात. शेजारून जाणारे माना डोलवत, काय टाईमपास लावलाय, असा शेरा मारून निघून जातात. त्यांच्या दृष्टीने ते 'फ्लॉवर' असतात, पण अनेकांमध्ये 'स्पार्क' असतो, 'फायर' असते आणि ती आग त्यांना नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवून देऊ शकते. रील्स किंवा शॉर्ट व्हिडीओ करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अनेक कंटेंट क्रिएटर आहेत. या माध्यमातून त्यांना चांगले पैसेही मिळताहेत. पण, हा 'ईझी मनी' नक्कीच नाही.

मेहनत और सब्र का फल...

एखाद्या गाण्याचा शॉर्ट व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि तो क्रिएटर रातोरात स्टार झाला, अशी उदाहरणं आपण बघतो. अशी एखादी बातमी वाचून अनेक तरुण लगेच स्वतःचा एखादा व्हिडीओ तयार करतात आणि लाईक्सची वाट बघत बसतात. पण, तसं नसतं मित्रहो. एका व्हिडीओमुळे जो रातोरात स्टार झाला, तो काही त्याचा पहिलाच व्हिडीओ नसतो. खूप महिन्यांपासून, कधी-कधी तर वर्षांपासून तो असे व्हिडीओ बनवत असतो, वेगवेगळे प्रयोग करत असतो, काहीतरी युनिक द्यायचा प्रयत्न करत असतो, सातत्य राखत असतो, लाईक्स न मिळालेल्या व्हिडीओंमधून शिकत असतो, झपाटून काम करत असतो आणि या चिकाटीचं फळ त्याला मिळालेलं असतं. ही गोष्ट या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी तर लक्षात घ्यायला हवीच, पण या 'सेलिब्रिटीं'ना नावं ठेवणाऱ्यांनीही त्यावर विचार करायला हवा.

अल्गो'रिदम' ओळखा!

काही जण म्हणतील, कसले चिल्लर आणि थिल्लर व्हिडीओ असतात हे, त्याचं कसलं आलंय कौतुक? कुणीही उठावं, काहीही बडबडावं आणि हिट व्हावं, अरे हट्! हे मतही पटणारं आहे. खूपदा आपल्या फीडमध्ये जे रील किंवा शॉर्ट व्हिडीओ दिसतात, ते अगदीच टुकार असतात, हे खरंच आहे. पण, ही गोष्ट 'अल्गोरिदम'मुळे होते आणि त्याचा फटका अनेक चांगल्या कंटेट क्रिएटर्सनाही बसतो. ज्या व्हिडीओवर जास्त इंटरॅक्शन (लाईक, कमेंट, शेअर), त्यांना तो विशिष्ट प्लॅटफॉर्म अधिक पूश करतो. हे कुणी व्यक्ती करत नाही, तर आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या आधारे हे काम होतं. त्यामुळे व्हिडीओचा 'दर्जा' तपासला जात नाही. पण, याच 'अल्गोरिदम'चा फायदा घेऊन आपण चांगले व्हिडीओही फीडमध्ये मिळवू शकतो. फक्त सुरुवातीला असे क्रिएटर्स धुंडाळण्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. पण दोन-चार वेळा तुम्ही या क्रिएटर्सचे व्हिडीओ पाहिलेत, की ते तुम्हाला सातत्याने दिसावेत, अशी व्यवस्थाही आर्टिफिशल इंटेलिजन्सने करून ठेवलीय.

पैसे कसे मिळतात?

टिक-टॉक बंद झालं असलं, तरी शॉर्ट व्हिडीओची अनेक अ‍ॅप (इन्स्टा, जोश, चिंगारी, मौज) उपलब्ध आहेत. यू-ट्युबसारखे बडे प्लेअर्सही 'शॉर्टस्'च्या बाजारात उतरलेत, यातून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकेल. या अ‍ॅपवर व्हिडीओ करून पैसे कसे मिळू शकतात, याबाबत आम्ही प्रोफेशनल डान्सर आणि शॉर्ट व्हिडीओ क्रिएटर असलेल्या हितेश चौहान आणि शिवानी कांदळगावकर यांच्याशी बोललो. ओरिजनल कंटेन्ट, युनिकनेस आणि कन्सिस्टंन्सी ही इथल्या यशाची त्रिसूत्री असल्याचं त्यांनी सांगितलं. ही त्रिसूत्री जे फॉलो करतात, त्यांना हळूहळू लोक फॉलो करू लागतात आणि एकदा का भक्कम फॉलोअर बेस तयार झाला की त्या पायावर आपण इमले रचू शकतो. आपण किती जेन्युईन आहोत, कुठल्या 'जॉनर'चा कंटेन्ट करतो, आपले फॉलोअर किती आणि कोण आहेत, हे पाहून काही वेळा ब्रँड्स थेट आपल्याशी 'डील' करतात किंवा अ‍ॅप त्यांच्या 'व्हेरिफाईड क्रिएटर्स'ना विशिष्ट प्रकारचा प्रमोशनल व्हिडीओ बनवायला सांगतं आणि रेव्हेन्यू शेअर करतं. 

जे फॅशन किंवा ब्युटी टिप्सचे व्हिडीओ करतात, त्यांना त्या क्षेत्रातील ब्रँड आपली जाहिरात करायला सांगू शकतात. फूड किंवा रेसिपीचे व्हिडीओ करणाऱ्यांना मसाला ब्रँडची जाहिरात मिळू शकते. एखाद्या सेलिब्रिटीला घेऊन जाहिरात करण्यापेक्षा इन्फ्लूएन्सरने केलेलं प्रमोशन तुलनेनं स्वस्तात होतं आणि अधिक प्रभावीही ठरू शकतं. कारण, इथे तुम्ही विशिष्ट वर्गाला टॅप करू शकता. तुमच्या प्रॉडक्टमध्ये ज्यांना रस आहे, थेट त्यांच्यापर्यंतच तुमची जाहिरात पोहोचते. या डीलमधील पैसे आपल्या फॉलोअर्सच्या संख्येवर आणि ब्रँडच्या क्षमतेवर ठरतात. अनेक अ‍ॅपही अशा प्रकारची प्रमोशन्स करत असल्यानं, त्यांनीही वेगवेगळ्या विषयांवरचे 'कंटेन्ट क्रिएटर' जोडून ठेवलेले असतात. 
 
आगीशी 'खेळ' नको!

क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता वापरून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे माध्यम अजिबातच वाईट नाही. पण, लाँग टर्म टिकायचं असेल तर काही पथ्यं, मूल्य पाळणं आवश्यक आहे. काहीतरी उथळ करून झटपट फॉलोअर्स वाढवणाऱ्या क्रिएटर्सची लोकप्रियता त्याच वेगाने खाली आल्याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळे कंटेंट क्वालिटीबाबत तडजोड करू नका. कदाचित, तुम्हाला तुमची ओळख निर्माण करायला वेळ लागेल. पण ससा व्हायचं की कासव होऊन शर्यत जिंकायची हे तुम्ही ठरवायचं. सगळ्यात वाईट नशा ही प्रसिद्धीची असते. ती डोक्यात जाणार नाही, याची काळजीही घ्यायला हवी. वर म्हटल्याप्रमाणे तुमच्यातली 'फायर' तुम्हाला प्रज्ज्वलित करू शकते, पण उगाच स्वतःला 'क्विन' किंवा 'किंग' वगैरे समजू लागल्यास तो आगीशी खेळही ठरू शकतो!      
 
amey.gogate@lokmat.com

Web Title: how to earn money by making reels or short videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.