प्ले-स्टोरवरून गायब झालं Google चं व्हिडीओ कॉलिंग अॅप; आत्ताच घेऊन ठेवा महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप
By सिद्धेश जाधव | Updated: March 29, 2022 18:58 IST2022-03-29T18:57:43+5:302022-03-29T18:58:11+5:30
Google चं अजून एक अॅप बंद करण्यात आलं आहे. यावेळी कंपनीनं आपलं चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलिंग अॅप प्ले स्टोरवरून हटवलं आहे.

प्ले-स्टोरवरून गायब झालं Google चं व्हिडीओ कॉलिंग अॅप; आत्ताच घेऊन ठेवा महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप
Google नं 2013 साली सादर केलेलं अॅप्लिकेशन प्ले स्टोरवरून काढून टाकलं आहे. सुरुवातीला Google+ चं फिचर म्हणून लाँच करण्यात आलेलं हे अॅप जीमेल सोबत देखील चॅटिंग अॅप म्हणून देण्यात येतं. गुगलनं हँगआऊट प्ले-स्टोरवरून काढून टाकलं आहे. याची जागा आता गुगल चॅट घेणार आहे. अॅप्पल अॅप स्टोरवर देखील Hangouts सापडत नाही. हे पाहिलं अॅप नाही ज्याची सेवा कंपनीनं बंद केली आहे, याआधी गुगलनं अनेक सेवा आणि अॅप्स प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बंद केले आहेत.
9to5Google च्या रिपोर्टमधून हँगआऊट गायब झाल्याची बातमी सर्वप्रथम समोर आली आहे. या अॅप मदतीनं चॅटिंग, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करता येते. परंतु एक-एक करून गुगलनं हे फीचर्स बंद करण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये हँगआउटची जागा गुगल चॅट घेईल अशी घोषणा करण्यात आली होती. 2020 मध्ये हे अॅप गुगल मीटसोबत मर्ज करण्यात आलं. त्यांनतर हँगऔटमधील व्हिडीओ कॉलिंग फिचर बंद करण्यात आलं आणि युजर्सना गुगल मीटवर पाठवण्यात आलं.
आता तर हे अॅप अॅप्पल अॅप स्टोरवर दिसत नाही. गुगल प्ले स्टोरवर देखील इन्स्टॉलचा ऑप्शन बंद ठेवण्यात आला आहे. जर तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइडमध्ये हे अॅप आधीच असेल तर तुम्ही हे वापरू शकता. परंतु आता नवीन अपडेट किंवा फीचर मिळणार नाही. तुम्ही तुमच्या महत्वाच्या चॅट्सचा बॅकअप घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अॅपच्या सेटिंगमध्ये जावं लागेल.