Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:47 IST2025-12-16T17:46:07+5:302025-12-16T17:47:13+5:30
Year Ender 2025: यावर्षी भारतीय बाजारात लॉन्च झालेल्या प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोनची यादी पाहुयात.

Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत सध्या फोल्डेबल स्मार्टफोनची मोठी लाट आली. सॅमसंगपासून गुगलपर्यंत दिग्गज कंपन्यांनी आपले अत्याधुनिक फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले असून ग्राहकांकडूनही त्यांना पसंती मिळत आहे. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, फोल्डेबल स्मार्टफोनचा हा ट्रेंड २०२६ मध्येही सुरू राहणार असून, आगामी काळात अधिक परवडणाऱ्या किमतीत फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, २०२५ वर्ष संपत असताना, या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या सर्वात चर्चेतील फोल्डेबल स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७
सॅमसंगने जुलै २०२५ मध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला होता. या फोनमध्ये ग्राहकांना ८ इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि ६.५ इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळतो. शिवाय, या स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्यासह १० मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ४ हजार ४०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते. या स्मार्टफोनची किंमत १ लाख ७४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ७
सॅमसंगने जुलैमध्ये झेड फोल्ड ७ सोबत झेड फ्लिप ७ लॉन्च केला. उघडल्यावर या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.९-इंचाचा आहे. तर, त्याचा कव्हर डिस्प्ले ४.१ इंचाचा आहे. त्यामुळे ग्राहकांना मुख्य डिस्प्ले न उघडताही फोन वापरता येतो. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळत असून यात ४३००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
विवो एक्स फोल्ड ५
विवोने यावर्षी जुलैमध्ये त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन विवो एक्स फोल्ड ५ लॉन्च केला. यात ८.०३ इंचाचा LTPO AMOLED मुख्य डिस्पे आणि ६.५ इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, दोन्ही 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी आहे. यात ५० मेगापिक्सेल कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन १ लाख ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
गुगल पिक्सेल १० प्रो फोल्ड
गुगलने ऑगस्टमध्ये हे फ्लॅगशिप डिव्हाइस लान्च केले. यात ८-इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि ६.४-इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे, दोन्ही 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह आहेत. हे गुगलच्या Tensor G5 चिपसेटला सपोर्ट करतात. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा (४८ + १०.०८ + १०.०५) सेटअप मिळतो. या स्मार्टफोनमध्ये ५ हजार १५ एमएएचची बॅटरी मिळते. या स्मार्टफोनची किंमत १ लाख ७२ हजार ९९९ रुपये आहे.