अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:13 IST2025-12-23T12:12:51+5:302025-12-23T12:13:06+5:30
China Nihao App vs India UPI: चीनने परदेशी पर्यटकांच्या सुविधेसाठी 'Nihao China' ॲप लाँच केले आहे. भारताच्या UPI One World शी याची तुलना केली जात असून, हे ॲप कसे काम करते ते जाणून घ्या.

अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
मुंबई: भारताच्या UPI प्रणालीने जगभरात आपला डंका वाजवला असतानाच, आता शेजारील देश चीनने देखील पर्यटकांच्या सुविधेसाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. चीनने परदेशी पर्यटकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यासाठी 'Nihao China' (निहाओ चायना) हे ॲप लाँच केले आहे. हे ॲप खास करून चीनमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या पेमेंट समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
चीनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 'कॅशलेस' व्यवहार चालतात, परंतु तेथील अलिपे आणि वीचॅट पे यांसारख्या स्थानिक प्रणालींमध्ये परदेशी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड लिंक करणे कठीण जात होते. यामुळे पर्यटकांना साध्या चहाच्या टपरीपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत पेमेंट करताना अडचणी येत होत्या. निहाओ चायना या एकाच प्लॅटफॉर्ममुळे आता पर्यटकांना त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्ड सहजपणे लिंक करता येतील.
भारताच्या 'UPI One World' शी तुलना
भारताने काही काळापूर्वी 'UPI One World' ही सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना स्थानिक बँक खाते नसतानाही UPI द्वारे पेमेंट करता येते. चीनचे नवीन ॲप हे भारताच्या याच 'UPI One World' ला दिलेले प्रत्युत्तर मानले जात आहे.
परदेशी पर्यटक आपल्या आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरचा वापर करून यावर नोंदणी करू शकतात. व्हिसा (Visa) आणि मास्टरकार्ड (Mastercard) सारखी जागतिक कार्डे थेट या ॲपला जोडता येतात. पर्यटकांच्या सुविधेसाठी हे ॲप अनेक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. चीनच्या या निर्णयामुळे तेथील पर्यटन क्षेत्राला फायदा होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या आणि डेटा प्रायव्हसीच्या बाबतीत हे ॲप भारताच्या UPI शी कशी स्पर्धा करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.