आत्मनिर्भरतेचे ‘बॅटलग्राउंड’ रिकामेच राहण्याची भीती..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 07:57 AM2021-06-23T07:57:12+5:302021-06-23T07:57:21+5:30

‘पब्जी’च्या विरहाने अस्वस्थ होऊन तुम्ही ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ हा नवा गेम डाऊनलोड केला असेल, तर तुमचा डेटा चीनच्या हाती लागणार, तेव्हा सावधान!

Fear of emptying the 'battleground' of self-reliance. | आत्मनिर्भरतेचे ‘बॅटलग्राउंड’ रिकामेच राहण्याची भीती..

आत्मनिर्भरतेचे ‘बॅटलग्राउंड’ रिकामेच राहण्याची भीती..

googlenewsNext

- विनय उपासनी

कोरोना या जगड्व्याळ आजाराची उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सबब चीन हा वाईट देश आहे, असे सांगत असलेल्या एका चिमुरडीचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला. त्याची ‘बातमी’ही झाली. गेल्याच आठवड्यात आणखी एक बातमी आली आणि ती म्हणजे ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ या मोबाइल गेमचे लाँचिंग. ‘प्लेअर्स अननोन बॅटलग्राउंड’ अर्थात ‘पब्जी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय असलेल्या मोबाइल गेमचे हे भारतीय रूप.

लाँचिंग होताच तब्बल ५० लाख लोकांच्या मोबाइलमध्ये हा गेम डाऊनलोडही झाला. वरकरणी या दोन्ही बातम्यांचा परस्परसंबंध असण्याचे काही कारण नाही; परंतु या दोन्हींमध्ये एकसमान धागा ‘चीन’ हा आहे. एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष. तो कसा, पाहूया. लडाख सीमेवर निर्माण झालेला तणाव, भारतीय जवानांच्या हौतात्म्याने माखलेले गलवानचे खोरे, चिनी लष्कर आणि राजकीय नेतृत्वाचा आडमुठेपणा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून भारत-चीन संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अनेक चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यात ‘पब्जी’ या खेळाचाही समावेश करण्यात आला. याला कारण ‘पब्जी मोबाइल’ या गेममध्ये टेन्सेंट या कंपनीची असलेली मोठी गुंतवणूक.

टेन्सेंट ही तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली अजस्त्र आकाराची चिनी कंपनी असून तिचे प्रमुख पोनी मा हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यही आहेत. अर्थात हे चीनच्या राजकीय आणि औद्योगिक धोरणाशी सुसंगतच. असो. तर पब्जी खेळामुळे अनेक भारतीय वापरकर्त्यांचा डेटा टेन्सेंट कंपनीकडे हस्तांतरित केला जात असून, त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याचे कारण पुढे करत या खेळावरील बंदी योग्य ठरविण्यात आली. ‘पब्जी’वरील बंदीमुळे अनेक तरुणांच्या हाताचा चाळा गेला, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. 

वस्तुत: ‘पब्जी’ खेळाची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव आहे क्राफ्टन. ही कंपनी दक्षिण कोरियास्थित आहे. मात्र, तीत टेन्सेंटचे समभाग मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणूनच पब्जी खेळाला भारतात लाल कंदील दाखवण्यात आला; परंतु आता क्राफ्टन कंपनीने ‘पब्जी’ला खास भारतीय वापरकर्त्यांसाठी बनवलेल्या फीचर्सची जोड देत ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ हा भारतीय वाटणारा नवा खेळ देशात पुन्हा आणला आहे.

‘पब्जी’चे हे भारतीय रूपडे भारतात सादर करताना क्राफ्टन कंपनीने टेन्सेंटशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगत खेळाचे भारतातील यजमानपद मायक्रोसॉफ्ट अझुरे डेटा सेंटर्सकडे सुपुर्द केल्याचे सांगितले आहे. मात्र, असे असले तरी क्राफ्टनमध्ये टेन्सेंटच्या असलेल्या गुंतवणुकीकडे डोळेझाक करून चालणारे नाही. ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ गेम डाऊनलोड करून त्यात डोके खुपसणाऱ्या वापरकर्त्यांचा डेटा हस्ते-परहस्ते टेन्सेंटकडे जाण्याचा धोका कायम आहेच. त्यामुळे ‘पब्जी’वर बंदी घालण्याची कृती अर्थशून्य ठरते. 

एकूणच बंदी घालण्यात आलेल्या चिनी कंपन्यांनी आडमार्गाने भारतात प्रवेश करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. ‘डेटा इज न्यू ऑइल’ या उक्तीमुळे हे तेल जिथून जास्त प्रमाणात उपसता येईल, तिथून उपसण्याचा चिनी कंपन्यांचा प्रयत्न असून, त्यात भारताला विशेष स्थान आहे. त्यामुळेच भारतातील दहा हजार महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवण्याच्या कामात चिनी कंपन्या हिरिरीने सहभागी होतात. एवढेच नव्हे तर कोरोनाप्रतिबंधक लसींची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्यांचे सर्व्हरही हॅक करण्यास धजावतात.

चिनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या या कारवायांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे आशीर्वाद असतात, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. इतर देशांच्या प्रणालींमध्ये घुसखोरी करून महत्त्वाचे तपशील मायदेशी पाठवणे हे चिनी कंपन्या आद्यकर्तव्य समजतात. कारण त्यांना तसे करणे कायदेशीररीत्या बंधनकारक करण्यात आले आहे. चीनच्या राष्ट्रीय गुप्तचर कायद्यानुसार चिनी कंपन्यांना त्यांच्याकडील डेटा सत्ताधीशांना देणे बंधनकारक आहे. देशासाठी करण्यात येणाऱ्या हेरगिरीच्या कामात सहकार्य करणाऱ्या कंपन्यांना चीन सरकार कायदेशीर संरक्षणही पुरवते. म्हणूनच चिनी कंपन्यांना इतर देशांमध्ये अरेरावी करण्यासाठी बळ मिळते. 

तात्पर्य, ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’च्या माध्यमातून आडमार्गाने भारतात येऊ पाहणाऱ्या चिनी कंपन्यांना आळा घातला जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आत्मनिर्भरतेचे ‘बॅटलग्राउंड’ रिकामेच राहण्याची भीती आहे.

Web Title: Fear of emptying the 'battleground' of self-reliance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.