Elon Musk fined: एलॉन मस्क यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) ला युरोपियन युनियन (EU) ने मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. डिजिटल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 'X' वर तब्बल १२० दशलक्ष युरो (सुमारे १,०८० कोटी रुपये) चा दंड लावण्यात आला आहे. 'X' ने डिजिटल सेवा कायदा (Digital Services Act - DSA) मधील महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे युरोपीय आयोगाने (European Commission) म्हटले आहे.
नेमका आरोप काय?
आयोगाच्या मते, 'X' ने पारदर्शकतेशी आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित तीन प्रमुख नियमांचे उल्लंघन केले आहे. यातील मुख्य आरोप 'ब्लू चेकमार्क'च्या डिझाइन संदर्भात आहे. EUच्या आरोपानुसार, हे डिझाइन फसवणूक करणारे (deceptive) असल्याने सामान्य वापरकर्ते गोंधळात पडू शकतात आणि यामुळे प्लॅटफॉर्मवर स्कॅम (Scam) तसेच बनावट खाती (Fake Accounts) वाढण्याची शक्यता निर्माण होते.
जाहिरातींच्या डेटाबेसमध्ये पारदर्शकता नाही
याव्यतिरिक्त, 'X' ने जाहिरातींच्या डेटाबेसमध्ये (Ad Database) पुरेशी पारदर्शकता ठेवली नाही. रिसर्चर्स हा डेटाबेस सहजपणे उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांना बनावट जाहिराती (Fake Ads) आणि चुकीचा प्रचार ओळखणे कठीण झाले. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्लॅटफॉर्मने संशोधकांना डेटा ॲक्सेस करण्यापासून अनावश्यकपणे अडथळे निर्माण केले.
EU च्या कार्यकारी उपाध्यक्षांनी स्पष्ट केले की, फसवणूक, जाहिरात लपवणे आणि संशोधकांच्या कामात अडथळा आणणे युरोपियन डिजिटल कायद्यांमध्ये मान्य नाही आणि DSA वापरकर्त्यांचे याच गोष्टींपासून संरक्षण करतो. युरोपियन युनियनच्या या कारवाईमुळे मस्क यांच्या कंपनीला मोठा झटका बसला असून, भविष्यात डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी पारदर्शकता आणि सुरक्षितता राखणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे.