मोदी सरकारची मोठी कारवाई! 6 लाख मोबाईल क्रमांक बंद होणार? कंपन्यांना दिला 'हा' आदेश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:08 IST2024-05-24T15:08:01+5:302024-05-24T15:08:17+5:30
वाढत्या सायबर/ मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

मोदी सरकारची मोठी कारवाई! 6 लाख मोबाईल क्रमांक बंद होणार? कंपन्यांना दिला 'हा' आदेश...
Department of Telecommunications : गेल्या काही काळापासून बनावट मोबाईल क्रमांकाच्या मदतीने गुन्हे वाढत असल्यामुळे दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल कंपन्यांना (टेलिकॉम ऑपरेटर) सुमारे 6 लाख 80 हजार मोबाइल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे कनेक्शन चुकीच्या किंवा बनावट ओळखपत्रांच्या आधारे घेतले गेले असावेत. दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना तपासणीसाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. 60 दिवसांत कंपन्यांनी चौकशी न केल्यास, हे संशयास्पद मोबाइल क्रमांक बंद करण्यात येतील, असेही विभागाने म्हटले आहे.
फसवणूक वाढली
फोनवरील फसवणूक खूप वाढली आहे, त्यामुळे दूरसंचार विभागाचे हे पाऊल आवश्यक आहे. विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने असे संशयास्पद क्रमांक शोधले आहेत. दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे की, विविध विभागांसोबत एकत्र काम करणे आणि फसवे कनेक्शन पकडण्यासाठी एआयचा वापर करणे खूप महत्वाचे आहे.
गेल्या आठवड्यात 1.7 कोटीहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद
दूरसंचार विभागाने सांगितले की, त्यांनी गेल्या आठवड्यात 1.7 कोटींहून अधिक बनावट मोबाइल कनेक्शन बंद केले आहेत. यातील सुमारे 0.19 लाख मोबाइल फोन सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले होते. विभागाला संचार साथी पोर्टलवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, गृह मंत्रालय आणि बँका, यांसारख्या महत्त्वाच्या विभागांकडूनही माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत 1.34 अब्ज मोबाइल कनेक्शन तपासले आहेत.
Chakshu Portal तक्रार करू शकता
सरकारने 'Chakshu Portal' हे आणखी एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही फोन कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशाची तक्रार करू शकता. आकडेवारीनुसार, आतापर्यंत दूरसंचार विभागाकडे 28412 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.