भारतात बंद झाले, मग Dream11 आता 'जगात' गेले! अमेरिका, यूकेसह ११ देशांमध्ये लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:16 IST2025-10-30T14:15:39+5:302025-10-30T14:16:20+5:30
Dream11 business Launch: भारताच्या 'रिअल-मनी गेमिंग' बंदीनंतर Dream11 ने ११ देशांमध्ये 'फ्री-टू-प्ले' मॉडेलसह विस्तार केला. अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश. महसुलासाठी जाहिरात आणि प्रायोजकत्वावर फोकस.

भारतात बंद झाले, मग Dream11 आता 'जगात' गेले! अमेरिका, यूकेसह ११ देशांमध्ये लॉन्च
भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी Dream11 ने भारतीय कायद्यातील बदलांनंतर मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय विस्तार करण्याची घोषणा केली आहे. 'रिअल-मनी गेमिंग' वर आलेल्या बंदीमुळे महसुलावर झालेल्या मोठ्या परिणामावर मात करण्यासाठी कंपनीने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
Dream11 ने अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या प्रमुख बाजारपेठांसह एकूण ११ देशांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे.
भारतातील कायद्याचा परिणाम
भारत सरकारने नुकताच 'ऑनलाइन मनी गेम्स'वर बंदी घालणारा कायदा लागू केला आहे. कंपनीचा ९५% महसूल आणि १००% नफा 'कॅश-आधारित' स्पर्धांमधून येत होता, ज्यावर आता भारतात बंदी आणली गेली आहे.
या कयाद्यावर मात करत Dream11 ने आता 'फ्री-टू-प्ले' मॉडेल स्वीकारले आहे. याचा अर्थ, युजर्सला फँटसी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. ड्रीम ११ जागतिक स्तरावर देखील 'रिअल-मनी गेम्स'आणणार नाहीय. तर जाहिराती आणि प्रायोजकत्वावर आधारित रेव्हेन्यू मॉडेलमधून पैसे कमविणार आहे.
कोणत्या देशांमध्ये लॉन्च?
अमेरिका, युनायटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया, युएई , न्यूझीलंड, कॅनडा, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांत ड्रीम ११ लाँच करण्यात आले आहे.