स्वस्तातल्या स्मार्टफोनवर नवे संकट! १०-१५ टक्क्यांनी महागण्याची शक्यता, Ai ने इथेही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:35 IST2025-10-28T08:35:04+5:302025-10-28T08:35:16+5:30
Budget Smartphone Price Hike: मेमरी चिप्स आणि स्टोरेजच्या किमती वाढल्याने स्वस्त स्मार्टफोन्सचे दर वाढण्याची शक्यता. AI डेटा सेंटरची मागणी हे मुख्य कारण. किंमत १०% पर्यंत वाढू शकते.

स्वस्तातल्या स्मार्टफोनवर नवे संकट! १०-१५ टक्क्यांनी महागण्याची शक्यता, Ai ने इथेही...
जर तुम्ही सणासुदीच्या काळात स्वस्त किंवा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच ती वेळ आहे, जिथे तुम्हाला कमी किंमतीत स्मार्टफोन मिळणार आहेत. कारण या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून (ऑक्टोबर-डिसेंबर) बजेट स्मार्टफोन्सच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.
या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मेमरी चिप्स आणि स्टोरेजच्या किमतीत झालेली मोठी वाढ ठरणार आहे. त्यामुळे, स्मार्टफोन बनवण्याचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे.
स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिप्सचे उत्पादन कमी करून, चिप उत्पादक कंपन्या आता उच्च-कार्यक्षमता असलेल्या बँडविड्थ मेमरी (HBM) च्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहेत. या HBM ला सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर मार्केटमध्ये गगनाला भिडणारी मागणी आहे. AI सर्व्हरसाठी ही मेमरी अत्यंत आवश्यक आहे, आणि कंपन्यांना स्मार्टफोनच्या भागांच्या तुलनेत HBM बनवण्यात जास्त नफा मिळत आहे. यामुळे या कंपन्यांनी सर्व ताकद तिकडेच लावण्यास सुरुवात केली आहे.
किंमती किती वाढू शकतात?
ट्रेन्डफोर्सच्या अहवालानुसार, स्वस्त स्मार्टफोन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या LPDDR4X चिप्सच्या किमतीत चौथ्या तिमाहीत १० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, स्मार्टफोनमधील स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या NAND फ्लॅश स्टोरेजच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ अपेक्षित आहे.
मेमरी आणि स्टोरेजच्या किमतीतील या वाढीमुळे स्मार्टफोन कंपन्यांवर मोठा दबाव येणार आहे. या दबावामुळे कंपन्या एकतर फोनमधील वैशिष्ट्यांमध्ये कपात करतील किंवा वाढलेला हा खर्च थेट ग्राहकांवर टाकतील, ज्यामुळे स्वस्त स्मार्टफोन महाग होणार आहेत. सध्या कंपन्यांनी तुटवडा जाणवू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे गणित कोलमडले असून त्याचा परिणाम किंमत वाढीवर झाला आहे.