अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:59 IST2025-09-25T11:58:08+5:302025-09-25T11:59:22+5:30
BSNL 4G Launch: बीएसएनएलने गेल्या वर्षभरापासूनच फोरजी रेडी क्षमतेची सिमकार्ड वाटण्यास सुरुवात केलेली आहे. परंतू, प्रत्येक वेळेला फोरजी सेवा सुरु करण्याचा मुहूर्त टळला जात होता. यंदा १५ ऑगस्टची तारीखही हुकली होती.

अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
आज येईल, उद्या येईल असे करता करता बीएसएनएल ४जी नेटवर्कच्या लाँचिंगचा मुहूर्त ठरला आहे. २७ सप्टेंबरला बीएसएनएल देशभरात फोरजी सेवा सुरु करत आहे. याबाबतची घोषणा बीएसएनएलने एक्स अकाऊंटवरून केली आहे.
बीएसएनएलने गेल्या वर्षभरापासूनच फोरजी रेडी क्षमतेची सिमकार्ड वाटण्यास सुरुवात केलेली आहे. परंतू, प्रत्येक वेळेला फोरजी सेवा सुरु करण्याचा मुहूर्त टळला जात होता. यंदा १५ ऑगस्टची तारीखही हुकली होती. अखेर आता २७ सप्टेंबरला फोरजी सेवा सुरु करत असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे.
अजूनही बीएसएनलची सेवा सो-सोच आहे. फोन आला तर उचलण्यापूर्वीच कट होत आहे, बोलण्यास सुरुवात केली तर समोरच्याचा आवाज आपल्याला आणि आपला आवाज समोरच्याला ऐकायला येत नाहीय. इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही तर फोनमध्ये रेंजचे देखील वांदे आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांनी त्यांची रिचार्ज महाग केली आहेत. अर्थात या कंपन्या ग्राहकांना फोरजी, फाईव्ह जी सेवा देत आहेत. तर बीएसएनएल अजूनही रडतखडत थ्री जी सेवाच देत आहे. यामुळे गावखेड्यातील ग्राहक बीएसएनएलच वापरत आहेत.
या लोकांना आता बीएसएनएल फोरजीचा फायदा होणार आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जे रवी यांनी बीएसएनएल ४जी सेवा देशव्यापी लाँच करण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएलची फोरजी सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिमकार्ड फोरजीमध्ये बदलून घ्यावे लागणार आहे. तसेच फोरजी फोन घ्यावा लागणार आहे. कंपनी रिचार्जचे दर वाढविणार की नाही, हे अद्याप समोर आलेले नाही.