इंटरनेटवर कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर आपण डोळे झाकून गुगलचा आधार घेतो. युझर्सचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी गुगलने २०२४ मध्ये 'AI Overviews' हे नवीन फिचर आणले. लांबलचक वेबसाइट्सच्या यादीऐवजी एआयने दिलेला संक्षिप्त सारांश वाचणे अनेकांना सोपे वाटते. मात्र, हेच स्मार्ट फिचर आता तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. सायबर गुन्हेगारांनी आता या फिचरचा वापर करून सर्वसामान्य लोकांची बँक खाती रिकामी करण्याचा नवा सापळा रचला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमका धोका काय?
गुगलच्या 'AI Overviews' मध्ये अनेकदा वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून माहिती गोळा करून एक सारांश दिला जातो. सायबर भामटे काय करत आहेत? ते छोट्या किंवा बनावट वेबसाइट्सवर मोठ्या कंपन्यांचे बनावट कस्टमर केअर नंबर टाकत आहेत. जेव्हा तुम्ही गुगलवर एखाद्या बँकेचा किंवा ई-कॉमर्स कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधता, तेव्हा हे एआय फिचर त्या बनावट वेबसाइटवरून चुकीचा नंबर उचलते आणि तुम्हाला अधिकृत माहिती म्हणून दाखवते.
एका कॉलवर बँक खाते रिकामे!
लोक एआयने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात आणि त्या नंबरवर कॉल करतात. समोर बसलेला ठग कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून तुमच्याकडून बँक डिटेल्स, ओटीपी किंवा एखादे ॲप डाउनलोड करण्यास सांगतो. तुम्ही ही माहिती दिली की क्षणात तुमचे बँक खाते साफ केले जाते. याला तांत्रिक भाषेत 'AI Hallucinations' म्हणतात, जिथे एआय सिस्टम चुकीची माहिती खरी म्हणून सादर करते.
तुलना करण्याची संधी हुकली!
याआधी जेव्हा आपण गुगलवर काही शोधायचो, तेव्हा अनेक वेबसाइट्सच्या लिंक दिसायच्या. त्यामुळे युझरला दोन-तीन ठिकाणी तपासून पाहण्याची संधी मिळायची. मात्र, आता एआय थेट निष्कर्ष किंवा उत्तर समोर ठेवते. युझर्सना वाटते की गुगलने दिलेले उत्तर हे अंतिम आणि सत्यच असणार, नेमका याच मानसिकतेचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी 'हे' नक्की करा:
१. अधिकृत वेबसाइटलाच भेट द्या: कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर नंबर हवा असल्यास गुगलच्या सारांशावर विश्वास ठेवण्याऐवजी थेट त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. माहितीची खातरजमा करा: एआयने दिलेला नंबर आणि खाली असलेल्या इतर सर्च रिझल्ट्समधील नंबर यांची तुलना करा.
३. ओटीपी शेअर करू नका: कोणतीही अधिकृत कंपनी किंवा बँक फोनवर तुमचा ओटीपी, पिन किंवा पासवर्ड मागत नाही, हे कायम लक्षात ठेवा.
गुगलने या फिचरमध्ये अतिरिक्त सुरक्षा उपाय जोडल्याचा दावा केला असला तरी, सायबर भामटे सातत्याने नवनवीन पळवाटा शोधत आहेत. त्यामुळे 'डिजिटल इंडिया'मध्ये वावरताना तुमची सतर्कताच तुमचा पैसा वाचवू शकते.
Web Summary : Cybercriminals exploit Google's AI Overviews with fake customer care numbers, tricking users into revealing bank details. Verify numbers on official websites and never share OTPs to avoid fraud. Stay vigilant in the digital world.
Web Summary : साइबर अपराधी Google के AI ओवरव्यू का इस्तेमाल कर फर्जी कस्टमर केयर नंबर देते हैं, जिससे यूजर्स बैंक डिटेल्स बता देते हैं। आधिकारिक वेबसाइटों पर नंबर सत्यापित करें और धोखाधड़ी से बचने के लिए OTP कभी शेयर न करें।