माणूस श्रेष्ठ की एआय? कार्लसनचं ‘उत्तर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:03 IST2025-10-16T08:03:27+5:302025-10-16T08:03:39+5:30
तीच आणि तशीच लढत आत्ता पुन्हा एकदा लावली गेली. स्पर्धक होते सध्याचा बुद्धिबळातला महान खेळाडू माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि चॅटजीपीटी!

माणूस श्रेष्ठ की एआय? कार्लसनचं ‘उत्तर’!
माणूस श्रेष्ठ की मशीन? गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा सुरू आहे. त्याच्या जोडीला आता नव्यानं भर पडली आहे ती म्हणजे माणूस श्रेष्ठ की ‘एआय’?
काही वर्षांपूर्वी बुद्धिबळातील तत्कालीन जगज्जेता गॅरी कॅस्पारोव्ह आणि ‘डीप ब्ल्यू’ हा सुपर कॉम्प्युटर यांच्यात बुद्धिबळाची लढत झाली होती. त्यात गॅरी कॅस्पारोव्हनं संगणकावर मात केली होती, त्यानंतरच्या लढतीत मात्र ‘डीप ब्ल्यू’नं गॅरी कॅस्पारोव्हला नमवलं होतं!
तीच आणि तशीच लढत आत्ता पुन्हा एकदा लावली गेली. स्पर्धक होते सध्याचा बुद्धिबळातला महान खेळाडू माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि चॅटजीपीटी! या लढतीत मॅग्नस कार्लसननं सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवताना एकही सोंगटी न गमावता चॅटजीपीटीला सहज पराभूत केलं. केवळ हिशेब आणि गणिती ताकद पुरेशी नसते, तर दीर्घकालीन रणनीती, सातत्यानं वेगानं बदलणारा डाव आणि प्रतिस्पर्ध्याच्या मनात डोकावण्याची ताकद या गोष्टीही अतिशय महत्त्वाच्या असतात, हे सध्या तरी कार्लसननं दाखवून दिलं आणि तीच त्याची खरी जमेची बाजू आहे.
प्रतिस्पर्ध्याच्या मनात डोकावायचं, त्याच्या डोक्यानं खेळायचं म्हणजे काय करायचं? तर आपला प्रतिस्पर्धी काय विचार करत असेल, तो आता कोणता डावपेच वापरेल हे आधीच ओळखायचं, त्याच्या मनातली ‘चाल’ ओळखायची आणि त्याला जाळ्यात पकडायचं! कार्लसननं चॅटजीपीटीच्या बाबतीत नेमकं तेच केलं. अर्थात चॅटजीपीटीही तेच करत होतं, पण या मानसिक खेळात कार्लसननं बाजी मारली.
कार्लसननं या सामन्यात चॅटजीपीटीवर मात करण्यासाठी काही खास डावपेच वापरले. चॅटजीपीटीला धक्का देणारी ओपनिंग त्यानं केली. कोणतंही इंजिन प्रतिस्पर्ध्याकडून काही ठराविक पद्धतीनं सुरुवात अपेक्षित करतं, पण कार्लसननं असामान्य सुरुवात करत एआयचा हिशेबच गुंडाळून टाकला. दुसरा डावपेच होता दीर्घकालीन दबाव. अनेक एआय इंजिन्स जलद घाव घालायला पारंगत असतात, पण कार्लसननं चॅटजीपीटीला चुका करायला भाग पाडलं. तिसरी गोष्ट म्हणजे मनोवैज्ञानिक खेळ. मानवी प्रतिस्पर्ध्यांसाठी हा ‘डाव’ कार्लसन अनेकदा वापरत असतो, पण एआयसमोर हा डाव काम करेल, असं वाटत नव्हतं. मात्र, कार्लसननं डावपेच बदलत बदलत खेळ एवढा गुंतागुंतीचा केला की एआयची ‘इव्हॅल्युएशन’ प्रणालीच गोंधळून गेली!
एआय प्रणाली आज अनेक ठिकाणी सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखली जाते आणि मानवी मेंदूलाच ती आव्हान देते, पण कार्लसनसारखा खेळाडू हे दाखवून देतो की मशीनपेक्षा मानवी अंतःप्रेरणा अजूनही पुढे आहे. मॅग्नस कार्लसन महान खेळाडू तर आहेच, पण तंत्र, रणनीती, वेग, विनोदबुद्धी, आत्मविश्वास.. या सगळ्याच गोष्टींचा संगम त्याच्यात झालेला आहे.
चॅटजीपीटी किंवा इतर एआय इंजिन्स कितीही सामर्थ्यवान असली तरी त्यांच्या मर्यादा आहेत. त्यांना ‘कशासाठी?’ हा प्रश्न पडत नाही. ते फक्त ‘कसं?’ या प्रश्नावर काम करतात. कार्लसन मात्र ‘का?’, ‘आत्ता नाही तर पुढे केव्हा?’, ‘हा खेळाडू अशी चाल खेळेल का? का खेळेल?’.. अशा प्रश्नांची उत्तरं सतत शोधत असतो. कार्लसनच्या विजयामागचा खरा संदेश हाच.. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी अंतःप्रेरणा, कल्पकता आणि धाडस यांना कोणीही मागे टाकू शकत नाही.