धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:31 IST2025-12-16T17:30:47+5:302025-12-16T17:31:15+5:30
Silent Calls : आजकाल अनेक लोकांच्या फोनवर असे कॉल येत आहेत, ज्याची रिंग तर वाजते, पण कॉल उचलल्यावर दुसऱ्या बाजुने कोणताही आवाज येत नाही.

धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
भारतात सायबर फसवणुकीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी स्कॅमर केवळ बनावट कॉल किंवा मेसेजपर्यंत मर्यादित होते, तिथे आता लोकांना टार्गेट करण्यासाठी ते नवीन आणि वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. या पद्धतींपैकी एक म्हणजे सायलेंट कॉल्स (Silent Calls), ज्याबाबत दूरसंचार विभागाने (DoT) सामान्य नागरिकांना अलर्ट केलं आहे.
आजकाल अनेक लोकांच्या फोनवर असे कॉल येत आहेत, ज्याची रिंग तर वाजते, पण कॉल उचलल्यावर दुसऱ्या बाजुने कोणताही आवाज येत नाही. बहुतेक लोक याकडे नेटवर्क समस्या किंवा चुकून फोन आला असेल असं समजून दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात हे कॉल स्कॅमर्सची एक सुनियोजित चाल असते.
सायलेंट कॉल का आहे घातक?
DoT नुसार, सायलेंट कॉल्सचा उद्देश फोनवर बोलणं हा नसतो. हे स्कॅमर या कॉल्सच्या माध्यमातून तुमचा मोबाईल नंबर सुरू आहे की नाही, हे तपासतात. एकदा त्यांना हे निश्चित झाले की नंबर एक्टिव्ह आहे, तेव्हा ते याच नंबरचा वापर पुढे फसवणूक, फिशिंग कॉल किंवा फेक मेसेज पाठवण्यासाठी करू शकतात. याचा अर्थ असा आहे की, सायलेंट कॉल स्वतःहून नुकसानकारक नसला तरी, तो भविष्यात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीची पहिली पायरी असू शकतो. याच कारणामुळे DoT ने लोकांना याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.
फ़ोन बजा, उठाया… लेकिन उधर कोई आवाज नहीं?
— DoT India (@DoT_India) December 15, 2025
ये कोई आम कॉल नहीं, बल्कि स्कैमर्स का तरीका है ये चेक करने का कि आपका नंबर एक्टिव है ना नहीं। ऐसे कॉल पर कॉल बैक ना करें और संचार साथी ऐप पर तुरंत रिपोर्ट करें।
थोड़ी सी समझदारी, बड़ी ठगी से बचाव
फ़ोन से जुड़े रहें, Silent Call से दूर… pic.twitter.com/LKJ9aIJj7c
DoT ने दिला महत्त्वाचा सल्ला
जर तुमच्या फोनवर कोणताही सायलेंट कॉल आला, तर तो नंबर त्वरित ब्लॉक करा आणि त्याची तक्रार करा. यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल आणि अशा नंबरवर योग्य कारवाई करणंही शक्य होतं.
सायलेंट कॉल्सची तक्रार कुठे आणि कशी करायची?
सरकारने यासाठी संचार साथी पोर्टल अंतर्गत Chakshu नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तक्रार करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे:
- सर्वात आधी sancharsaathi.gov.in ही वेबसाइट ओपन करा.
- Citizen Centric Services सेक्शनमध्ये जाऊन Chakshu हा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये कॉलशी संबंधित माहिती भरायची आहे.
- यानंतर आपले बेसिक डिटेल्स भरा.
- तुमच्या मोबाईलवर आलेला OTP व्हेरिफाय करा.
- फॉर्म सबमिट करताच तुमची तक्रार दाखल होईल.
सायलेंट कॉल्सकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. थोडीशी सतर्कता आणि योग्य वेळी केलेली तक्रार तुम्हाला सायबर फसवणुकीपासून वाचवू शकते. जर कोणताही कॉल संशयास्पद वाटला, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याची तक्रार करणं हेच सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.