अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
जगप्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल भारतात एक भलेमोठे ऑफिस थाटणार आहे. यासाठी कंपनीने बंगळुरुमध्ये 2.7 लाख स्क्वेअर फुटांची जागा भाडेतत्वावर घेतली आहे. या नवीन ऑफिसची इमारत १५ मजली आहे. यापैकी ९ मजले कंपनीने घेतले आहेत. यामध्ये १२०० कर्मचारी काम करणार आहेत.
असे नाहीय की अॅप्पलकडे भारतात ऑफिस नाहीय. मुंबई, बंगळुरू, हैदराबादसह गुरुग्राममध्ये देखील कंपनीचे कार्पोरेट ऑफिस आहे. परंतू, तरीही अॅप्पल महिन्याला ६.५ कोटी रुपये भाडे देऊन नवीन ऑफिस थाटणार आहे. यामध्ये एक प्रयोगशाळा देखील असणार आहे. म्हणजे थोडक्यात अॅप्पल यामध्ये रिसर्चही करणार आहे.
अॅप्पलचे भारतात ३००० कर्मचारी आहेत. कंपनीने सुमारे ३१.५७ कोटी रुपयांची सुरक्षा ठेव जागा मालकाकडे जमा केली आहे. ३ एप्रिल २०२५ पासून या भाडेकराराला सुरुवात केली जाणार आहे. दरवर्षी ४.५% नी भाड्यामध्ये वाढ केली जाणार आहे. पुढील १० वर्षांसाठी ही जागा घेण्यात आली असून याकाळात कंपनी १०१८ कोटी रुपये मोजणार आहे.
बेंगळुरूच्या मध्यभागी असलेल्या आमच्या नवीन कार्यालयासह भारतात विस्तार करण्यास अॅप्पल उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया अॅप्पलच्या प्रतिनिधीने दिली आहे. अॅपलने एम्बेसी झेनिथ बिल्डिंगच्या ५ व्या मजल्यापासून ते १३ व्या मजल्यापर्यंत एकूण ९ मजले भाड्याने घेतले आहेत.