मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:16 IST2025-11-03T18:13:49+5:302025-11-03T18:16:27+5:30
फोनमध्ये काही छोटीमोठी गडबड झाली की, फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पण, कधी कधी फोन एखाद्या कारणाशिवाय देखील रिस्टार्ट केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत.

मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
आपल्या हातातील छोटंसं यंत्र अर्थात मोबाईल फोन, याच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. मोबाईल हा दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एखादा दिवस जर फोन बिघडला तर अवघं जग थांबल्यासारखं वाटतं. पण, फोनमध्ये काही छोटीमोठी गडबड झाली की, फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. पण, कधी कधी फोन एखाद्या कारणाशिवाय देखील रिस्टार्ट केला पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्या व्यक्तीलासुद्धा कदाचित फोन रिस्टार्ट करण्याचे फायदे माहिती नसतील. पण, फोनच्या परफॉर्मन्सपासून ते त्याच्या बॅटरी लाईफपर्यंत अनेक गोष्टींसाठी फोन रिस्टार्ट करणे फायद्याचे आहे. ज्याप्रमाणे माणसाला रोजच्या कामातून एका ब्रेकची गरज असते, त्याचप्रमाणे फोनला देखील रिस्टार्ट ब्रेकची गरज असते.
स्पीड आणि परफॉर्मन्स होतो बूस्ट
मोबाईल फोन रीस्टार्ट करण्याचा मोठा फायदा असा आहे की, यामुळे रॅम क्लिअर होतो. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट केला की त्याच्या रॅमवर साठून राहिलेल्या कॅश फाइल्स काढून टाकल्या जातात. तुम्ही एखादे अॅप बंद केले तरीही ते बॅकग्राउंडमध्ये चालू राहू शकते, ज्यामुळे रॅम भरतो आणि फोनचा वेग कमी होतो. अशावेळी जर तुम्ही तुमचा फोन रिस्टार्ट केला, तर रॅम बॅकग्राऊंड अॅप बंद करतो, ज्यामुळे तुमच्या फोनचा वेग आणि कार्यक्षमता वाढते.
कनेक्टिव्हिटीशी संबंधित समस्या दूर होतात
जर तुम्हाला वाय-फाय, ब्लूटूथ किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत असतील, तर तुमचा फोन रिस्टार्ट केल्याने बऱ्याचदा या समस्या सुटू शकतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट केला आहे, पण तरीही इंटरनेट काम करत नाही. बऱ्याच लोकांना वाटेल की, ही समस्या वाय-फायमध्ये आहे, परंतु कधीकधी दुसऱ्या फोनच्या हॉटस्पॉटशी कनेक्ट केल्यानेही इंटरनेट बिघाड होऊ शकतो. मात्र, फोन रिस्टार्ट करून अशा कनेक्टिव्हिटी समस्या सोडवता येतात.
मोबाईल फोन हँग होण्याची समस्या दूर होते
जर, तुमचा फोन जास्त हँग होत असेल, तर तुम्ही त्याला एकदा तरी रिस्टार्ट करून बघायला हवे. यामुळे समस्या तात्पुरती कमी होऊ शकते. पण, जर तुमचा फोन वारंवार हँग होत असेल, तर त्याचे नेमके कारण शोधून समस्येचे निराकरण करायला हवे. एकंदरीत, फोन रिस्टार्ट केल्याने मेमरी रिफ्रेश होण्यास, अॅप एरर दुरुस्त होण्यास आणि किरकोळ सिस्टम ग्लिच दूर करण्यास मदत होते.