अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:16 IST2025-12-08T13:15:13+5:302025-12-08T13:16:18+5:30
काही वेळा फोनमध्ये तांत्रिक गडबड नसतानाही तो आपल्याला एक 'अलर्ट' देत असतो की, आता नवीन फोन घेण्याची वेळ आली आहे.

अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!
स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण, आपला जुना फोन कधी बदलायचा, हा प्रश्न अनेकांना पडतो. बाजारात रोज नवीन मॉडेल्स येत असतानाही, आपण आपला जुना फोन वापरत राहतो. मात्र, काही वेळा फोनमध्ये तांत्रिक गडबड नसतानाही तो आपल्याला एक 'अलर्ट' देत असतो की, आता नवीन फोन घेण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही वेळीच हा इशारा ओळखला नाही, तर तुमचा महत्त्वाचा डेटा गमावणे, सायबर हल्ल्यांना बळी पडणे किंवा ऐन गरजेच्या वेळी फोन बंद पडणे, अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
काय आहेत 'हे' संकेत
बॅटरी लवकर संपणे : फोनची बॅटरी हेल्थ ही तुमचा फोन जुना झाल्याची सर्वात मोठी ओळख आहे. जर तुमचा फोन ४०-५०% चार्ज असताना अचानक १०-२०% वर आला. किंवा, तुम्हाला दिवसभरात वारंवार फोन चार्ज करावा लागत असेल. याचा अर्थ, बॅटरी खराब झाली आहे आणि हे नवीन स्मार्टफोन घेण्याचे स्पष्ट संकेत आहे. खराब बॅटरीमुळे फोन कधीही बंद पडू शकतो.
सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स बंद होणे : प्रत्येक कंपनी एका ठराविक काळानंतर जुन्या फोन्सना अपडेट्स देणे थांबवते. काही कंपन्या २-३ वर्षांसाठी, तर सॅमसंग आणि गुगलसारख्या कंपन्या ५-७ वर्षांसाठी अपडेट्स देतात. जर तुमच्या फोनला सिक्युरिटी अपडेट्स मिळणे बंद झाले असतील, तर हा फोन बदलण्याचा सर्वात योग्य काळ आहे. सुरक्षा अपडेट्सशिवाय तुमचा स्मार्टफोन सायबर हल्ल्यांसाठी खूप संवेदनशील बनतो. जुन्या सॉफ्टवेअरमुळे अनेक नवीन ॲप्स नीट चालत नाहीत आणि फोनचा परफॉरमन्सही ढासळतो.
आपोआप बंद पडणे किंवा रीस्टार्ट होणे : जर तुम्ही फोन वापरत असताना तो अचानक बंद पडत असेल किंवा स्वतःहून रीस्टार्ट होत असेल, तर हा एक मोठा धोक्याचा संकेत आहे. याचा अर्थ तुमचा फोन आता एक्सपायरी डेटच्या जवळ पोहोचला आहे आणि लवकरच तो पूर्णपणे बंद पडू शकतो. या परिस्थितीत, तुमचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने नवा फोन घेणे अधिक सुरक्षित आहे. तसेच, जुन्या फोनमधील डेटाचा बॅकअप घेणे विसरू नका.
नेटवर्क समस्या आणि ॲप्स क्रॅश होणे : फोन जुना झाल्यावर त्याची नेटवर्क पकडण्याची क्षमता कमकुवत होते. नेटवर्क पूर्णपणे गायब होणे किंवा सिग्नलची समस्या वारंवार जाणवणे. ॲप्स वारंवार क्रॅश होणे किंवा फोन खूप हँग होणे किंवा स्लो चालणे. हे सर्व संकेत स्पष्टपणे सांगतात की, आता तुमच्या फोनची क्षमता संपली आहे आणि अपग्रेडची वेळ आली आहे. जुन्या प्रोसेसरमुळे ॲप्सचा ताण तो सहन करू शकत नाही.
जर तुमच्या फोनमध्ये वरीलपैकी दोन किंवा अधिक समस्या सतत दिसत असतील, तर वेळ न घालवता नवीन फोन घेण्याचा विचार करा.