जिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅन, 98 जीबी डेटासह मिळणार 'या' सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 11:53 IST2018-01-02T11:50:43+5:302018-01-02T11:53:58+5:30
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला आहे.

जिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅन, 98 जीबी डेटासह मिळणार 'या' सुविधा
मुंबई- जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे युजर्सना हा प्लॅन घेता येईल.
रिलायन्स जिओच्या 799 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते आहे. याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. पण या प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेटसह एक अट घालण्यात आली आहे. युजरला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळेल. 28 दिवसांसाठी हा प्लॅन लागून असून त्यामध्ये 84 जीबी डेटा मिळणार आहे. जीओ व एअरटेलच्या या डेटा प्लॅनची तुलना केल्यास एअरटेलकडून युजर्सना जास्त इंटरनेटची सुविधा दिली जाते आहे.
याशिवाय एअरटेलच्या 399 रूपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 56 दिवस दररोज 1 जीबी डेटा दिला जातो आहे. तसंच अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधाही दिली जाते आहे. पण यामध्ये एअरटेलने एक अट घातली असून 250 पेक्षा जास्त कॉल युजर्सला करता येणार नाही. तर अख्ख्या आठवड्यात 1 हजारपेक्षा जास्त कॉल करता येणार नाहीत. 448च्या रिचार्जमध्ये 70 दिवसांसाठी या सुविधा देण्यात आल्या आहेत.