आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:58 IST2018-09-25T13:57:49+5:302018-09-25T13:58:02+5:30
भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई
कोविलोवो (सर्बिया) : भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली.
भारतीय खेळाडूंनी मुलांच्या कॅडेट एकेरी, मुलांच्या कॅडेट सांघिक व मुलींच्या ज्युनियर सांघिक गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मुलांच्या व मुलींच्या कॅडेट सांघिक, मुलांच्या कॅडेट दुहेरी व मुलींच्या दुहेरी गटात रौप्यपदक मिळवले. मुलांच्या कॅडेट एकेरी गटात दोन कांस्य आणि मुलांच्या ज्युनियर सांघिक, मुलींच्या ज्युनियर सांघिक, मुलींच्या कॅडेट एकेरी व मुलांच्या कॅडेट दुहेरी गटात प्रत्येकी एक कांस्यपदक मिळवले.
मुलींच्या ज्युनियर गटात इंडिया वन संघात दिया चितळे, स्वस्तिका घोष व अनुशा कुटुंबले यांचा समावेश होता. त्यांनी अंतिम सामन्यात सिंगापूरला 3-1 अशा फरकाने नमवत सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या कॅडेट गटात भारताच्या दोन संघांनी सहभाग नोंदवला होता. पायस जैन- विश्वा दिनादयालन आणि दिव्यांश श्रीवास्तव- आदर्श ओम छेत्री या जोड्यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. पायस जैन - विश्वा दिनादयालन जोडीला मुलांच्या कॅडेट दुहेरी गटात चीनाच्या जोडीकडून 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात रिगन अल्बुक्युरेक्यु, मनुश शाह व अनुक्रम जैन यांनी कांस्यपदक मिळवले. मुलांच्या कॅडेट एकेरी गटात भारतीय खेळाडूंनी उपांत्यफेरीतील चार स्थानांपैकी तीन स्थान मिळवले. पायस जैनने सुवर्णपदक, आदर्श ओम छेत्री व दिव्यांश श्रीवास्तव यांनी कांस्यपदक मिळवले. मुलींच्या कॅडेट एकेरी गटात दोन भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.त्यापैकी काव्या स्री बास्करने उपांत्यफेरी गाठली. तिला चीनच्या झेयान लीकडून पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदक मिळाले. मुलींच्या कॅडेट दुहेरी गटात अनार्ग्या मंजुनाथ- लक्षिता नारंग यांना अंतिम फेरीत चीनच्या जोडीकडून पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.