सुवर्णपदकविजेत्या 'या' खेळाडूला अजूनही मिळाले नाही सरकारी बक्षिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 20:58 IST2018-07-30T20:57:31+5:302018-07-30T20:58:15+5:30
या स्पर्धेतील विजेत्यांना सरकारने रोख बक्षिस जाहीर केले होते. पण हे बक्षिस तीन महिन्यांनंतरही तिला मिळालेले नाही.

सुवर्णपदकविजेत्या 'या' खेळाडूला अजूनही मिळाले नाही सरकारी बक्षिस
नवी दिल्ली : भारताच्या एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावले तर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होते. पण हे बक्षिस त्यांना वेळेत मिळतेच असेल नाही. असेच काहीसे घडले आहे ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णापदकांसह एकूण चार पदके पटकावणाऱ्या महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राची.
गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनिकाने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना सरकारने रोख बक्षिस जाहीर केले होते. पण हे बक्षिस तीन महिन्यांनंतरही मनिकाला मिळालेले नाही.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूने दिल्ली सरकारने 14 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. त्याचबरोबर रौप्य आणि कांस्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे दहा आणि सहा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. पण मनिकाला या बक्षीसामधील एकही रुपया मिळालेला नाही.
मनिकाने याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली. या भेटीनंतर लवकरच आम्ही तुला बक्षिस स्वीकारण्यासाठी आमंत्रित करू, असे आश्वासन केजरीवाल यांच्याकडून देण्यात आले आहे.