दारूसाठी कायपण, कुठेपण! तलावात उलटला ट्रक; बॉक्स लुटण्यासाठी तरुणांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:31 AM2022-01-18T10:31:20+5:302022-01-18T10:34:19+5:30

तुळजापूरजवळील पाचुंदा तलावानजीक येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तलावात उलटला.

youths Jump into the lake to loot boxes of liquor from truck in tuljapur | दारूसाठी कायपण, कुठेपण! तलावात उलटला ट्रक; बॉक्स लुटण्यासाठी तरुणांच्या उड्या

दारूसाठी कायपण, कुठेपण! तलावात उलटला ट्रक; बॉक्स लुटण्यासाठी तरुणांच्या उड्या

Next

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर-लातूर मार्गावरून विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन काेल्हापूरकडे निघालेल्या एका ट्रकला सोमवारी पहाटे अपघात झाला. तुळजापूरजवळील पाचुंदा तलावानजीक येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तलावात उलटला. यानंतर, काही तरुणांनी जीव धोक्यात घालत पाण्यात उतरून मद्याचे बॉक्स पळवले. लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील लुटालूट टळली.   

कर्नाटकातील हुमनाबाद येथून विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन एक ट्रक कोल्हापूरकडे निघाला होता. चालक अनिल महादेव हिंगमिरे व क्लीनर रमेश भारत खडपिडे (दोघे रा. देगलूर, जि. नांदेड) हे ट्रक तुळजापूरमार्गे नेत असताना सोमवारी पहाटे शहराजवळील पाचुंदा तलावानजीक चालकाचे नियंत्रण सुटले. प्रसंगावधान राखून चालक आणि क्लीनरने ट्रकमधून बाहेर उडी घेतली. यानंतर, हा ट्रक तलावातील सुमारे १५ फूट खोल पाण्यात पडला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची माहिती परिसरात पसरताच काही तरुण तिथे जमले. त्यांनी पाण्यात उड्या टाकून ट्रकमधील मद्याचे काही बॉक्स बाहेर काढले. ते पोत्यात भरून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.         

मद्याचे बॉक्स घेऊन जात असलेला ट्रक पहाटे उलटला आहे. यामध्ये नेमके किती किमतीचे मद्य होते, हे अद्याप कळू शकले नाही. या संदर्भातील पावत्याही ट्रकमध्येच होत्या. सविस्तर माहिती घेऊन घटनेची नोंद करण्यात येणार आहे.  
- अजिनाथ काशिद, पोलीस निरीक्षक, तुळजापूर.

Web Title: youths Jump into the lake to loot boxes of liquor from truck in tuljapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app