आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:13 IST2021-03-31T13:13:41+5:302021-03-31T13:13:49+5:30
सिद्धवचन - दुःख

आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार...!
अपत्याच्या दुःखे | कष्टी बाप - माय |
इतरांस काय | दुःख त्याचे ? || २४९.६ ||(अभंगगाथा)
आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार असतो. दुसऱ्याने सदाचार केला. त्याचे मोक्षरूपी फल आपल्याला मिळणार आहे काय ? दुसऱ्याच्या दुराचारामुळे आपण भवपाशात ढकलले जाणार आहोत काय ? हे देवा, आमचे लक्ष लिंगावर असते. तुझे लक्ष आमच्यावर असते. माझे हे शब्द खोटे ठरवू नकोस. मुलांचे दुःख पाहून त्याच्या आई-वडिलांनाच दुःख होते. इतरांना दुःख होत नाही. हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, आमचे दुःख तुझेच दुःख होय.
परमेश्वराची सेवा, चिंतन, नामस्मरण, भक्ती मनापासून केली की आपल्याला तो निश्चिंत करतो. जगद्गुरु तुकोबारायांनी ' घालूनियां भार राहिलों निश्चिंतीं || ३४५५.१ || असे म्हटले आहे. आपली सगळी चिंता त्याला असते. याचे ज्ञान ज्याला नाही तो चिंता करीत बसतो. याचे ज्ञान ज्याला झाले आहे तो निश्चिंत असतो. लक्ष्मण महाराज म्हणतात, ' दुःख निवारी शंकर | करा वश गंगाधर || १४४९.१ || शंकराला वश करण्यासाठी भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.
शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे ; हे मल्लय्या तुझे लक्ष आमच्यावर असते. मल्लय्याचे लक्ष आपल्याकडे राहावे यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केलेले चिंतन, भक्ती आपल्यालाही करावी लागेल.
मल्लय्याची सेवा | करुया मनाने |
दुःख जाते त्याने | निश्चितच || १ ||
आपलेही दुःख | घेतो शिरावरी |
करू भक्ती खरी | तेव्हाच हो || २ ||
सिद्धदास म्हणे | करू आता भक्ती |
मग मिळे शक्ती | सर्वार्थाने || ३ ||
- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर