This year in Solapur, there are more than ten thousand idols of Shadu Antami | सोलापुरात यंदा दहा हजारांपेक्षाही जास्त शाडू अन् मातीच्या मूर्ती

सोलापुरात यंदा दहा हजारांपेक्षाही जास्त शाडू अन् मातीच्या मूर्ती

ठळक मुद्देयंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणपतींना मागणीसरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहेपुढच्या वर्षापासून पीओपीवर पूर्णपणे बंदी आणली जाणार

सोलापूर : सोलापुरातील गणेश मूर्तिकारांनी यंदा दहा हजारांहून अधिक शाडू तसेच इतर मातीच्या मूर्ती बनविल्या आहेत. सुंदर तसेच आकर्षक अशा या शाडूच्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरात तीन हजारांहून अधिक इको फ्रेंडली अर्थात शाडू गणेशमूर्तींचे बुकिंग झाले आहे. येथील मूर्तिकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सोलापुरातील मूर्तिकारांमध्येही पर्यावरणप्रेम जागृत होतेय. गणेश मूर्तीबद्दल लोकमतने लोकमत इनिशिएटिव्ह उपक्रमातून पर्यावरण जनजागृती मोहीम उघडली आहे. या मोहिमेची दखल शेकडो सोलापूरकरांनी घेतली आहे. लोकमतमध्ये प्रसिद्ध होणाºया बातम्यांमुळे आम्ही शाडू गणेश मूर्तींच्या प्रेमात पडलो आहोत, अशी प्रांजळ कबुली देखील सोलापूरकर देत आहेत.

यापूर्वी इको फ्रेंडली गणेशमूर्तींना एवढे पॉझिटिव्ह वातावरण नव्हते. यंदा अनेक मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत. गणेशभक्त गणेशमूर्ती पाहण्यासाठी विविध मूर्तिकारांकडे जात आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाहताना अनेक जण शाडूच्या मूर्ती आहेत का, अशी विचारणा करताहेत; तर काही जण अनामत रक्कम देऊन शाडूच्या गणेशमूर्ती बनवून घेत आहेत. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक शाडूच्या मूर्तींचे बुकिंग झाले आहे. 

सोलापुरातील गणेश मूर्तिकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्लॅस्टर आॅफ पॅरिस अर्थात पीओपीच्या गणपतींना मागणी कमी आहे. सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे. फक्त याच वर्षी बंदीमध्ये शिथिलता आली असून, पुढच्या वर्षापासून पीओपीवर पूर्णपणे बंदी आणली जाणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांना पूर्वीप्रमाणे मातीच्या कलेला जवळ करावे लागेल. पीओपीला विसरावे लागेल. त्याशिवाय पर्यावरण जनजागृती  होणार नाही, पर्यावरणाचे संवर्धन होणार नाही, अशा भावना मूर्तिकारांकडून व्यक्त होत आहेत.

शासनाच्या सहकार्याने शक्य
मूर्तिकार गोपाळ भोसले सांगतात, मूर्तिकार सरकारच्या नियमांचे पालन करणार आहेत. मूर्तिकारांची बाजू देखील शासनाने समजून घेतली पाहिजे. मातीकला ही भारतीय संस्कृती जपणारी आहे. या संस्कृतीला आम्ही मानतो. संस्कृती कला जोपासताना शासनाने मूर्तिकारांना काही सवलती दिल्या पाहिजेत. मूर्तिकारांना अर्थसाह्य दिले पाहिजे. शासनाकडून सकारात्मक प्रोत्साहन मिळाल्यास आम्ही शंभर टक्के मातीपासूनच मूर्ती बनवू.

Web Title: This year in Solapur, there are more than ten thousand idols of Shadu Antami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.