टोप्यांची दुनिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:47 PM2019-09-28T17:47:23+5:302019-09-28T17:49:40+5:30

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीचा कानोसा...

The world of hats ... | टोप्यांची दुनिया...

टोप्यांची दुनिया...

Next

रविंद्र देशमुख

नवीपेठ अन् टिळक चौकातील टोप्यांच्या दुकानात वर्दळ वाढायला लागलीय. सध्या उन्हाळा नाही अन् पावसाळाही परतायला लागलाय. पक्षपंधरवडा जाण्याच्या मार्गावर असला तरी तोंडावर नवरात्र आहे. त्यामुळे लगीन सराई तर नाहीच नाही. मग टोप्यांच्या दुकानात कुठून आलीय गर्दी?.. आता आम्ही पक्के सोलापुरी. आमचं डोकं फास्ट चालतंय. टोप्यांच्या दुकानातली गर्दी कशामुळे? हे न ओळखायला आम्ही काय येडं बिडं आहोत काय? इलेक्शन आहे ना! कार्यकर्ते, नेते येत असतील टोप्या घ्यायला! आम्ही बरोब्बर ओळखलं.

दुकानातल्या हालचाली समजून घ्यायला थेट आत गेलो.. नमस्कार ओ मालक. काय सध्या तुमची जोरदार चलती सुरू हाय. महाळाच्या महिन्यातबी जोरदार धंदा करालावं.. मालक म्हणाले, व्हय व्हय. निवडणुका आल्यात ना! कार्यकर्ते यायलेत टोप्या घ्यायला. कार्यकर्ते ढीगभर टोप्या घेऊन निघून गेले. मालकाने पैसे मोजून गल्ल्यात ठेवले. आता काउंटर रिकामं झालं होतं. मालकाशी बोलणं टाळून आम्ही शोकेसमधल्या टोप्यांचं निरीक्षण करू लागलो.. भगव्या, पांढºया, निळ्या, पिवळ्या टोप्यांनी शोकेस पुरतं भरून गेलं होतं...
पांढºया टोपीचा चेहरा कसनुसा झाला होता. चेहºयावर बारा वाजले होते. भगवी मात्र पुरती खुश होती.. चेहरा खुलला होता. निळ्या, पिव्ळ्या अन् इतर रंगांच्या टोप्या आपापल्या जागेवर शांत बसून होत्या... पांढºया टोपीची उदासी पाहून आम्हालाच राहवलं नाही. सरळ मालकालाच विचारायचं ठरवलं.. मालक, ओ मालकऽऽऽ या पांढरीला काय झालंय? नेहमी तर खुलली असतीय अन् आताच काय झालं एकदम?... मालक काही बोलण्याच्या आतच पांढरी टोपी बोलू लागली.. आण्णा, काय सांगू तुम्हाला? गेली सत्तर वर्षे माझं पुढारी अन् कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अढळ स्थान व्हतं. पण या भगव्या टोपीनं माझी जागा छिनली.. आता काउंटरवर आलेले गिराईक माझ्याकडं बघ नं बी झालेत... इलेक्शनच्या काळात कुठं नको, कुठं जाऊ, अशी माझी अवस्था व्हायची, आता टोपी डोक्यावरच काय? हातात घ्यायला बी कोण तयार नाय... सर्व त्या भगवीची मागणी करू लागलेत. बघा.. बघा, कशी आकडायला लागलीय ती. मलाही त्या पांढºया टोपीची स्थिती पाहून वाईट वाटलं.. काय करणार बिच्चारी?

इलेक्शनच्या       तोंडावर ते हातवाले, घड्याळवाले नेते-पुढारी अन् कार्यकर्ते कमळवाल्यांच्या पक्षात गेल्यानं पांढºया टोपीची हीच गत व्हायची. पांढरीचं मी सांत्वन करू लागलो.. बये, काळाचा महिमा हा!.. आजकाल  तत्त्वाचं राजकारण कुठं चाललंय?.. राजकारण हा आता व्यवसाय झालायं. ‘जिकडं खोबरं, तिकडं चांगभलं’ म्हणण्याचा जमाना आहे.. पण काळजी  करू नको. निष्ठावंत अजूनही आहेत. बघितलंय परवा, ते घड्याळवाल्यांचे जुने जाणते नेते इथं आले होते. गर्दी होती की त्यांच्याभोवती!.. मग असे निष्ठावंत, पर्यायचं नाही म्हणून बनलेले काही निष्ठावंत येतील की, तुला न्यायला!.. त्यामुळे   अशी हारून बसू नको... आता भगव्या टोपीचे दिवस आहेत. त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार कर अन् निवडणुकीला सामोरं जा !

Web Title: The world of hats ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.