Barshi Murder : दीड महिन्यापूर्वी गळा आवळून एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह बार्शी शहरातील अलीपूर रोडवरील शेतातील उभ्या ज्वारीच्या पिकात टाकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास करून हत्या प्रकरणाचे गूढ उकलले असून आता आरोपीला अटक केली आहे. नितीन प्रभू जाधव (वय ३५, रा. घाटांगरी, ता. धाराशिव), असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३० ते ३५ वयोगटातील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अलीपूर रोडवरील ज्वारीच्या पिकात आढळला होता. त्यानंतर शेतमालक प्रवीण संताजी गव्हाणे यांनी बार्शी शहर पोलिसांत २६ जानेवारी रोजी खबर दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून बेवारस म्हणून नोंद केली होती. त्यानंतर तपास करताना १० ते २६ जानेवारीदरम्यान आरोपी व मयत झालेल्या महिला या दोघांमध्ये संबंध होते. तेव्हा झालेल्या वादातून तिचा गळा आवळून खून केला आहे आणि तिचा मृतदेह ज्वारीच्या पिकात टाकल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई बाळासाहेब जाधव करत आहेत.