कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 2, 2025 16:58 IST2025-07-02T16:56:37+5:302025-07-02T16:58:33+5:30

अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला.

Why did you insist on going, baby? Now I have to go home alone; Grandma breaks the silence for Govinda | कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा

कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा

-बाळकृष्ण दोड्डी, सराटी 
तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणाऱ्या एका वीसवर्षीय युवकाने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागही घेतला. रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वासमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला. विशेष म्हणजे, त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याची आजी एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले.

कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का... माझ्या लेकीला काय उत्तर देऊ.. असे हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते. सहा वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेना. त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनारी बसून राहिली. प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांच्या दिंडी क्रमांक १२ मधील वारकरी संतापले. रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. अर्धा तासाहून अधिक वेळ त्यांनी रास्ता रोखून धरला.

घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. मृतदेह शोधून काढण्याचा शब्द दिल्यानंतर वारकरी रस्त्यावरून उठले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. दिंडी क्रमांक १२ मधील काही वारकरी त्या रडणाऱ्या आजीसोबत थांबले.

एकुलता एक मुलगा

ही दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकर कराबे यांच्या बाबतीत घडली आहे. नदीत वाहून जाणाऱ्या युवकाचे नाव गोविंद कल्याण फोके (वय २०, रा. झिरपी) असे आहे. 

गोविंद हा फरागबाई कराबे यांच्या लेकीचा मुलगा असून तो यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला. गोविंद हा नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा असून, फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. १८ जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक १२ (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) मध्ये तो सहभाग झालेला होता.

Web Title: Why did you insist on going, baby? Now I have to go home alone; Grandma breaks the silence for Govinda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.