सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार, जलवाहिनीचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:28 IST2018-01-25T13:26:57+5:302018-01-25T13:28:13+5:30
स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार, जलवाहिनीचा पत्ताच नाही
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून २१ कोटी रुपये खर्चून रंगभवन ते पार्क चौक हा स्मार्ट रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या हाकेच्या अंतरावर ह. दे. प्रशालेच्या पाठीमागे ख्रिश्चन मिशन ट्रस्टच्या जागेवर ४०० कुटुंबांची वसाहत निर्माण झाली आहे. पण गेल्या २0 वर्षांत या वसाहतीला पाणी दिले जात नाही. आंदोलनानंतर वसाहतीच्या एका बाजूला सार्वजनिक नळ कनेक्शन देण्यात आले. दोन बोअर घेण्यात आले, पण ते बंद स्थितीत आहेत. त्यामुळे महिलांनी आंदोलन केल्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण टँकर ठेकेदाराला मनपाने बिल न दिल्याने टँकरही तीन दिवसाआड येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
या परिसरातील नागरिकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी अमेरिकन मराठी मिशन ट्रस्टचे चेअरमन नितीन नवगिरे यांनी केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तपासणीसाठी आलेल्या पथकाला येथील लोक उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनाला आल्यावर तातडीने २0 सीटचे शौचालय बांधून देण्यात आले. पण पाण्याची सुविधा नसल्याने शौचालयाचा वापर कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात जलवाहिनी टाकण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दाखल घेतली जात नाही. स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या या भागातील रहिवाशांना अवेळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबाबत खुलासा करताना झोन अधिकारी शांताराम आवताडे यांनी टँकरचा पाटा तुटल्याने समस्या निर्माण झाली होती. नगरसेवक चेतन नरोटे यांनी माहिती दिल्यावर टँकर पूर्ववत करण्यात आला असल्याचे सांगितले. सहायक अभियंता डंके यांनी ही झोपडपट्टी घोषित नसल्याने सुविधा पुरविण्याबाबत अडचण येत असल्याचे स्पष्ट केले.
----------------------
येथील नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत पाठपुरावा केला. दोन बोअर घेतले. जलवाहिनीसाठी ५ लाख निधीची मागणी केली. पण अतिक्रमित वसाहत असल्याने सुविधा देता येत नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटीतील एरिया असल्याने याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार आहे.
- श्रीदेवी फुलारे, नगरसेविका