मोडनिंबचा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद; नागरिकांचे हाल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:44 AM2019-03-09T11:44:26+5:302019-03-09T11:46:11+5:30
मोडनिंब : गावातील नळयोजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. ...
मोडनिंब : गावातील नळयोजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
याबाबत सविस्तर असे, मोहोळ तालुक्यातील येवती तलावातून मोडनिंब, माढा, आष्टी, रोपळे, शेटफळ यासह अन्य गावांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या येवती तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने व नळपाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मोडनिंब पाणीपुरवठ्यासाठी चार जलकुंभ असून, यामधून एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र पंधरा दिवसांपासून येवती तलावातील पाणीपातळी खालावल्याने मोडनिंब गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीत तलावाजवळील विद्युतपंपाच्या साह्याने पाणी टाकले जाते व ते विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे मोडनिंबजवळील जलशुध्दीकरण केंद्रात सोडले जाते. तेथून गावातील जलकुंभात सोडले जाते.
या धरणात पाटबंधारे खाते पाणी कधी सोडणार, याबाबत कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अनेकदा प्रयत्नही करून फोन घेतला नाही. याबाबत मोडनिंबचे सरपंच जयसिंग म्हणाले, पाणी संपुष्टात आल्याने गढूळ व गाळमिश्रित पाणी व तेही अपुरे यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. येवती तलावात पाणी सोडावे, यासाठी १४ मार्चपासून येवती तलावालगतच आमरण उपोषणास बसणार असून, याबाबत संबंधित खात्यास कळविले असल्याचे सांगितले.