उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले!
By Admin | Updated: August 8, 2014 01:08 IST2014-08-08T01:08:59+5:302014-08-08T01:08:59+5:30
कालव्यातून ३०००, बोगद्यातून १५० क्युसेक्स

उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले!
बेंबळे : जळून चाललेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी अखेर उजनी धरणातून गुरुवारी सकाळी सहा वाजता भीमा उजवा-डावा कालवा, भीमा-सीना जोडकालव्यातून (बोगदा) सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणाचे पावर हाऊस (वीजनिर्मिती) केंद्र आजपासून कार्यान्वित झाले आहे. त्यासाठी १६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले ते पाणी भीमेत सोडण्यात येणार आहे.
राज्यभर सर्वदूर पावसाने चांगली साथ दिली असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी सोडण्यासाठी मागणीचा रेटा वाढला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावर मतदारांची नाराजी व्यक्त होऊ नये म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व लहान-मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.
----------------------------
तीन हजार क्युसेक्स
जलसंपदा विभागाच्या वतीने आज सकाळी उजनी धरणातून सकाळी कालव्याद्वारे प्रथम एक हजार क्युसेक्सने पाणी सोडले तर त्यात वाढ करुन दहा वाजता तीन हजार क्युसेक्सने पाणी सोडले. भीमा-सीना जोडकालव्यातून १५० क्युसेक्स तर पॉवर हाऊसमधून भीमेत १६०० क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे.