डॉक्टरांचा काम बंदचा इशारा; लसीकरणासाठी 'या' पंचायत समिती सदस्यांने केली शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 17:30 IST2021-05-26T17:13:41+5:302021-05-26T17:30:46+5:30
सोलापूर जिल्ह्यातील घटना

डॉक्टरांचा काम बंदचा इशारा; लसीकरणासाठी 'या' पंचायत समिती सदस्यांने केली शिवीगाळ
सोलापूर: जिल्ह्यात लसीचा तुटवडा असताना करमाळा पंचायत समितीतील एका सदस्याने डॉक्टराला पंचायत समितीच्या कार्यालयात बोलावून घेऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकाराचा निषेध करीत जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव, यांच्या नेतृत्वाखाली राजपत्रित डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. जोगदंड, डॉ. थोरात यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन करमाळा पंचायत समितीच्या कार्यालयात घडलेल्या प्रकाराबाबत निवेदन दिले. संबंधित करमाळा पंचायत समितीचे सदस्य राहुल सावंत यांनी डॉ. घोगरे यांना सोमवारी कार्यालयात बोलावून घेतले. डॉक्टर घोगरे कार्यालयात आल्याबरोबर संबंधित सदस्यांने त्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अवमान केला. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील डॉक्टर अहोरात्र सेवा देत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अशात कामाचा ताण असतानाही सर्वजण गोरगरीब रुग्णांची सेवा करीत आहेत.
जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. अशामुळे नागरिकांच्या भावना तीव्र होत आहेत. यामध्ये डॉक्टरांचा कोणताही दोष नसताना करमाळा पंचायत समितीच्या सदस्याने डॉ.घोगरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. अशा घटनांमुळे लोकांचे डॉक्टरांविरोधात धैर्य वाढत आहे. संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. सिईओ स्वामी यांनी घडल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.