‘यूपी’तून ‘व्होटिंग मशिन
By Admin | Updated: August 5, 2014 01:26 IST2014-08-05T01:26:48+5:302014-08-05T01:26:48+5:30
विधानसभेची तयारी: तीन पथके रवाना; १०,२०० नवीन मशिन येणार

‘यूपी’तून ‘व्होटिंग मशिन
सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्याचे प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यासाठी १० हजार २०० मतदानयंत्रे (व्होटिंग मशीन) यूपीतून (उत्तर प्रदेश) मागविण्यात आली आहेत. याकामी तीन तहसीलदारांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, आठवडाभरात हा ‘लवाजमा’ सोलापुरात पोहोचेल, अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत ७२०० मतदानयंत्रे (बॅलेट युनिट) आणि ३७०० कंट्रोल मशिन वापरली गेली. एका मतदान केंद्रासाठी एक बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट वापरले जाते. दोन्ही लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांची संख्या १६ पेक्षा जास्त असल्याने प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिटचा वापर झाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची वाढती संख्या गृहीत धरून नवीन व्होटिंग मशिन्स मागविण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर, महाराजगंज, रामपूर येथून या मशिन्स आणण्यासाठी तीन तहसीलदारांची स्वतंत्र पथके पोलीस फौजफाट्यासह मंगळवारी (दि. २९ जुलै) रवाना झाली आहेत.
सहारनपूरसाठी बाबुराव पवार (तहसीलदार, दक्षिण सोलापूर), रामपूरसाठी रमेश शेंडगे (तहसीलदार, माढा) व महाराजगंजसाठी सदाशिव पडदुणे (तहसीलदार, मोहोळ) यांची ही पथके आहेत. त्यांच्यासमवेत सहा कर्मचारी आणि चार पोलिसांची कुमक देण्यात आली आहे. रात्रीचा प्रवास टाळून मजल-दरमजल करीत या पथकांनी सोमवारी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दोन दिवस या सर्व मशिन्सची कसून तपासणी केली जाईल. त्यानंतर त्या ताब्यात घेऊन मोठ्या कंटेनरमधून सोलापूरच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी अपेक्षित आहे.
---------------------
कर्फ्युचा फटका
सध्या सहारनपूर येथे कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तहसीलदार बाबुराव पवार यांना यामुळे शहरात प्रवेश करणे अडचणीचे ठरले आहे. दुपारी दोन तास कर्फ्यू शिथिल करण्यात आल्यानंतर त्यांनी लगबगीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
-------------------------
अशा आहेत मशिन्स
सोलापूरसह अनेक ठिकाणी सध्या वापरात असलेल्या व्होटिंग मशिन्स २००६ पूर्वीच्या आहेत. २००६ नंतर अद्ययावत बनावटीच्या मशिन्स निवडणूक आयोगाकडून पुरविल्या जात आहेत. यूपीतून येणाऱ्या मशिन्स नवीन आहेत. डिस्पले अंतर्गत रचना आणि मॉडेलमध्ये काहीसा फरक करण्यात आला आहे.
-----------------------
सहारनपूर येथून ७०० कंट्रोल युनिट, रामपूरहून २२०० बॅलेट युनिट (मतदान यंत्र), १७०० कंट्रोल युनिट तर महाराजगंज येथून ३७०० बॅलेट युनिट, १९०० कंट्रोल युनिट अशी १० हजार २०० युनिट सोलापूरसाठी मागविले आहेत.