विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
By आप्पासाहेब पाटील | Updated: July 6, 2025 04:57 IST2025-07-06T04:56:26+5:302025-07-06T04:57:16+5:30
चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी... असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे.

विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी... असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आज रविवार, आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून कैलास दामू उगले (वय ५२ वर्षे) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय ४८ वर्षे) मु. पो. जातेगांव, ता. नांदगाव जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. दाम्पत्य गेल्या १० ते १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. कैलास यांचे वडील माजी सैनिक आहेत.
शासकीय महापूजेवेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, राजेंद्र शेळके, मनोज शोत्री यांच्यासह अन्य अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.