उद्याही राहणार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद; कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 01:14 PM2021-02-23T13:14:13+5:302021-02-23T13:14:58+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Vitthal-Rukmini temple to remain closed tomorrow; Collector's order due to corona infection | उद्याही राहणार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद; कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उद्याही राहणार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद; कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

googlenewsNext

पंढरपूर  : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना उद्या बुधवारी (ता. २४ ) श्री विठ्ठल - रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्या माघ द्वादशी बुधवारी देखील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 

माघी दशमी सोमवार आणि एकादशी मंगळवार (ता. २२ आणि २३) असे दोन दिवस श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काल सोमवारी आणि आज मंगळवारी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे उद्या (बुधवारी) माघ द्वादशी दिवशी देखील मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढला असून त्याविषयी श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीला कळविण्यात आले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर २२ व २३ तारखेला बंद ठेवण्यात आले असून, उद्या (बुधवारी) सलग तिसऱ्या दिवशीही मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. 

दरम्यान, आज (मंगळवारी) माघ एकादशी दिवशी पंढरपूर शहर आणि लगतच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट अशा सर्व भागात आज नीरव शांतता दिसत आहे. जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरातील सर्व आस्थापना, व्यापारी बाजारपेठा पूर्ण बंद आहेत. ऐन यात्रा काळात दुकाने बंद ठेवण्याची वेळ येत असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमधून मात्र चिंता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Vitthal-Rukmini temple to remain closed tomorrow; Collector's order due to corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.