गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
By आप्पासाहेब पाटील | Updated: November 2, 2025 05:55 IST2025-11-02T05:54:48+5:302025-11-02T05:55:43+5:30
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पोटा (बु.) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर मानाचे वारकरी ठरले

गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाच्या मुख्य स्रोताच्या केंद्रस्थानी आहे पंढरीचा विठुराया. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पायी माथा टेकण्यासाठी असंख्य वारकरी तसेच भक्त मोठ्या श्रद्धेनं पंढरपुरात येतात. जणूकाही ‘विठो पालवीत आहे’ या भावनेनं त्याच्या पायी माथा टेकतात. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पोटा (बु ) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला.
दरम्यान, रामराव वालेगावकर यांची पोटा येथे शेती आहे. त्यांचा मूळ व्यवसाय शेती हाच आहे. मागील वीस वर्षापासून ते पंढरपुरात होत असलेल्या वर्षातील प्रमुख चार वारीत ते सहभागी होतात. त्यांना दोन मुलं असून सुना नातवंड असा परिवार आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते शनिवारी पंढरपुरात दाखल झाले. शनिवारी सकाळी ते विठ्ठलाच्या दर्शनाची आज घेऊन दर्शन रांगेत उभा राहिले, दिवसभर विठुनामाचा गजर करत दर्शन रांगेत उभा असलेल्या रामराव यांना मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून बोलाविण्यात आले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. कशाचीही अपेक्षा न करता मागील वीस वर्षापासून करीत असलेल्या वारीतील सहभागाचा हे फळ मिळाल्याचं रामराव यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितलं.