विजय, आर्यन शुगरच्या मालमत्तेवर ताबा

By Admin | Updated: August 6, 2014 01:04 IST2014-08-06T01:04:10+5:302014-08-06T01:04:10+5:30

जिल्हा बँकेची कारवाई : थकबाकी न भरल्याने उचलले पाऊल

Vijay, control of Aryan Sugar property | विजय, आर्यन शुगरच्या मालमत्तेवर ताबा

विजय, आर्यन शुगरच्या मालमत्तेवर ताबा


सोलापूर : थकबाकीच्या रकमेसाठी आर्यन शुगर, खामगाव व विजय शुगर, करकंब यांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्याची नोटीस जिल्हा बँकेने बजावली आहे. थकबाकीचा विषय उच्च न्यायालयात सुरू असतानाच जिल्हा बँकेने वसुलीसाठी मालमत्ता ताब्यात घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकी वसुलीचा विषय सध्या ऐरणीवर आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने व अन्य संस्थांनी बिगरशेतीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम थकल्याने बँक अडचणीत आली आहे. थकबाकीचे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने बँकेला न्यायालयातही उत्तरे द्यावी लागत आहेत. यामुळे बँकेने थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या संबंधित बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर व माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील विजय शुगरला कलम १३(२) अन्वये ७ एप्रिल २०१४ रोजी ६० दिवसांत देय रक्कम भरण्याची नोटीस पाठविली होती. २८ फेब्रुवारी २०१४ अखेर विजय शुगरकडे मुद्दल व व्याजाची ८४ कोटी २४ लाख ७० हजार इतकी रक्कम होती. याच तारखेला आर्यन शुगरकडे ९३ कोटी दोन लाख ५१ हजार इतकी मुद्दल व व्याजाची रक्कम थकीत होती.
जिल्हा बँकेने दिलेल्या नोटीसप्रमाणे विजय शुगर व आर्यन शुगरने मुद्दल व व्याजाची रक्कम भरली नाही. कलम १३(४) नियम ९ अन्वये बँकेने २७ जुलै रोजीच मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा घेतला असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. दोन्ही साखर कारखान्यांचे प्लॅन्ट, मशिनरी, कारखाना व इमारतीचा ताबा घेतल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
-------------------------

Web Title: Vijay, control of Aryan Sugar property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.