वेंकटरमना गोविंदा गोविंदा; तिरूपती - बालाजीच्या प्रसादाला सोलापुरी बेदाण्याचीही गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:26 PM2021-03-15T16:26:09+5:302021-03-15T16:26:14+5:30

महिन्याकाठी दहा टनाची मागणी : शेतकऱ्यांना मिळाला चांगला भाव

Venkataramana Govinda Govinda; Tirupati - Balaji's prasada is also sweetened with Solapuri raisins | वेंकटरमना गोविंदा गोविंदा; तिरूपती - बालाजीच्या प्रसादाला सोलापुरी बेदाण्याचीही गोडी

वेंकटरमना गोविंदा गोविंदा; तिरूपती - बालाजीच्या प्रसादाला सोलापुरी बेदाण्याचीही गोडी

googlenewsNext

राजकुमार सारोळे

साेलापूर: तिरूपतीच्या लाडू प्रसादात सोलापूरच्या बेदाण्याला स्थान मिळाले आहे. कोरोना महामारीनंतर सोलापुरातून महिन्याला दहा टन बेदाणा प्रसादासाठी देवस्थानकडे रवाना होत आहे.

तिरूपतीच्या दर्शनानंतर मिळणाऱ्या लाडूचा प्रसाद जगप्रसिद्ध आहे. या प्रसादात वापरले जाणारे बेदाणे सांगलीतून मागविले जात होते. कोरोना महामारीमुळे प्रसिद्ध तिरूपती मंदिर दर्शनासाठी काही काळ बंद होते. दरम्यानच्या काळात प्रसादासाठी लागणाऱ्या बेदाण्यासाठी नवी निविदा मागविण्यात आली. त्यात सोलापूरच्या शेतकऱ्यांने भरलेली निविदा मंजूर झाली आहे. देवस्थानच्या टीमने येऊन संबंधित शेतकऱ्याच्या बेदाणा निर्मितीची पाहणी केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नवीन प्लॉन्ट व प्रक्रियेसाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधनाचा वापर यामुळे आरोग्यदायी बेदाणा निर्मितीची खातरजमा करून निवड करण्यात आली. सध्या अनलॉकनंतर कोरोना महामारीचे नियम पाळून भक्तांना दर्शन दिले जात असल्याने महिन्याकाठी दहा टन बेदाणा मागविला जात आहे. फेब्रुवारीअखेर पहिला कंटेनर तिरूपतीला रवाना झाला आहे, अशी माहिती शिवानंद शिंगडगाव यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन वर्षांपासून बेदाणाचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी या तालुक्यांबरोबरच कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात बेदाणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याशिवाय विषमुक्त द्राक्षशेतीवर भर दिल्याने परराज्यातून बेदाणाला चांगली मागणी येऊ लागली आहे. सोलापूरबरोबरच पंढरपूर बाजार समितीत बेदाणा लिलावाला प्रतिसाद मिळत आहे.

सिद्धीविनायक ट्रस्टकडून पाहणी

मुंबईच्या सिद्धीविनायकाच्या प्रसादात बेदाणा वापरला जातो. यासाठी सोलापूरच्या बेदाण्याची या ट्रस्टने पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत सांगलीच्या बेदाण्याची राज्यभर चर्चा होती, पण आता या स्पर्धेत सोलापूरचेही नाव आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Venkataramana Govinda Govinda; Tirupati - Balaji's prasada is also sweetened with Solapuri raisins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.