वैराग/सोलापूर : प्रशासनाची परवानगी न घेता शासकीय जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा दहा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा बसविल्यानंतर बार्शी तालुक्यातील वैराग येथे पोलीस आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला. संतप्त जमाव पोलीस ठाण्यासमोर जमल्यानंतर पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. घटनेत दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वैराग येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पहाटे बसविल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीला पांगविले. बळाचाही वापर केला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सभापती मकरंद निंबाळकर, माजी तालुका पंचायत सदस्य निरंजन भुमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच संजय भुमकर यांना पोलिसांनी चौकशी करण्याकरिता सकाळी ठाण्यात बोलाविले होते.
यावेळी राजकीय लोकप्रतिनिधी व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. गोंधळ वाढताच ग्रामस्थांनी 'पोलीस अन्याय करत आहेत,' असे समजून पोलीस स्टेशनलाच घेरावा घातला. यावेळी जमावाला पांगविताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिया करीत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.