उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी
By रवींद्र देशमुख | Updated: May 6, 2023 17:46 IST2023-05-06T17:46:30+5:302023-05-06T17:46:37+5:30
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार

उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के! पाच महिन्यात संपले 54 टीएमसी पाणी
रविंद्र देशमुख, सोलापूर : राज्यातील सर्वात मोठे धरण, अशी ओळख असलेल्या उजनी धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा अवघ्या पाच महिन्यात संपला आहे. शनिवारी दुपारी धरणातील उपयुक्त जलसाठा शून्यावर आला आहे. धरण मायनस होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी तारांबळ होणार आहे.
चालू वर्षी धरणातून बेसुमार पाणी सोडले गेले. मागील पावसाळ्यात उजनी धरण १११ टक्के भरून धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा झाला होता. तो ८ डिसेंबरपर्यंत टिकून होता. त्यानंतरच्या काळात शेती व सोलापूरला पिण्यासाठी वेळोवेळी पाणी सोडले गेले. परिणामत: धरणातील ५४ टीएमसी उपयुक्त जलसाठा ५ महिन्यात संपला आहे.
सूर्य सध्या आग ओकत असल्याने धरणातील मृत साठ्यातील पाण्याचेही बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या शेतक-यांनाही दररोज विद्युत मोटारीचे पाईप व केबल वाढवून चारी खोदून पाणी उपसा करावा लागत आहे.
पळसदेवचे शिखर पाण्याबाहेर
उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्याने इंदापूर तालुक्यात पाण्यात बुडालेले पळसदेव मंदिराचे शिखर पाण्याबाहेर डोकावू लागले आहे. कालव्याद्वारे किंवा बोगद्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडता येत नाही. त्यामुळे शेतक-यांना आता ऐन उन्हाळ्यात उभी पिके जगण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.